सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांची तत्काळ घटनास्थळी शोधमोहीम
By दीपक देशमुख | Updated: May 21, 2025 15:34 IST2025-05-21T15:32:32+5:302025-05-21T15:34:31+5:30
सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञाताने बुधवारी मेलद्वारे दिली. जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेत ...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांची तत्काळ घटनास्थळी शोधमोहीम
सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञाताने बुधवारी मेलद्वारे दिली. जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकासह पोलीस घटनास्थळी आले अन् शोध मोहीम सुरू केली.
याबाबात माहिती अशी, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित कामकाज सुरू होते. दुपारी साडेबारा वाजता एका अज्ञाताने धमकीचा मेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेल अकाऊंटवर केला. मेल चेन्नई येथून आल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आदींनी याची माहिती ताबडतोब पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर पोलीस पथक बॉम्बशोधक पथकासह तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणालाही याची माहिती नव्हती. पोलिसांनी आल्यानंतर सर्व जिल्हाधिकारी कार्यालय रिकामे करण्यास सांगितले. व सर्व कर्मचाऱ्यांना विविध यंत्रणा बंद करून आहे अशा स्थितीत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सर्वांना जमा होण्यास सांगितले.
त्यानुसार सर्व कर्मचारी फाइल्स जागेवर ठेवून तातडीने मुख्य प्रवेशद्वाराकडे रवाना झाले. यानंतर बॉम्ब शोधक पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील कोपरा आणि कोपरा स्कॅन केला. सर्व इमारतीमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. याच वेळी मुसळधार पाऊस आल्यामुळे बाहेर उभ्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना झेरॉक्स सेंटर व इमारतींचा आसरा घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात भर पावसात पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.
मॉकड्रिल वाटले पण..
धमकीचा मेल पाहिल्यानंतर सुरुवातीला सर्वांना हे मॉकड्रिल वाटले परंतु ही खरोखरच धमकी असल्याचे लवकरच लक्षात आले.