'सह्याद्री'मध्ये वाघीण ठरतेय वंशवृद्धीची जननी!, तीनवेळा दिला पिल्लांना जन्म 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:00 IST2025-08-05T17:00:23+5:302025-08-05T17:00:44+5:30

वाघिणीने तीनवेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद असून, तिच्या लेकीही आता सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रजनन करत आहेत

This tigress was recorded to have given birth to cubs three times during the period of SKP 02 residing in the Sahyadri Tiger Reserve | 'सह्याद्री'मध्ये वाघीण ठरतेय वंशवृद्धीची जननी!, तीनवेळा दिला पिल्लांना जन्म 

'सह्याद्री'मध्ये वाघीण ठरतेय वंशवृद्धीची जननी!, तीनवेळा दिला पिल्लांना जन्म 

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणारी ‘एसकेपी ०२’ ही वाघीण आता सह्याद्रातील वाघांचा वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची जननी ठरली आहे. सन २०१४ ते २०२५ या कालावधीत या वाघिणीने तीनवेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद असून, तिच्या लेकीही आता सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रजनन करत आहेत.

कणखर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आजही वाघांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. वन विभागाच्या मदतीने हा अधिवास अभ्यासण्याचे काम ‘वाईल्ड लाईफ काॅन्झर्व्हेशन ट्रस्ट’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सह्याद्रीतील वाघांच्या संचार मार्गाला सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग म्हटले जाते.

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. संपूर्ण भ्रमणमार्ग प्रदेशात साधारण ३२ वाघांचे अस्तित्व आहे, तर केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास ही संख्या ११ ते १२ च्या घरात आहे. यामधील ‘एसकेटी ०२’ या वाघिणीच्या अस्तित्वाची नोंद पंजाबी २०१४ सालापासून करत आहेत. एसके म्हणजे सह्याद्री-कोकण, टी म्हणजे टायगर आणि ०२ म्हणजे क्रमांक होय. 

या वाघिणीने २०१३, २०१५ आणि २०१७ या कालावधीत पिल्लांना जन्म दिला आहे. २०१७ सालानंतर तिच्यासोबत पिल्लांची नोंद करण्यात आलेली नाही. सन २०२३ साली कॅमेऱ्यात टिपलेल्या फोटोवरून ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पिल्लांची नोंद झाली नाही. सद्य:स्थितीत अंदाजे १५ वर्षांची असणारी ही वाघीण आजही निर्भयपणे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात वावरत आहे. त्यामुळे सह्याद्रीतील वाघांचे कूळ ती अजून कितपत वाढवेल, हे येणारा काळच ठरवले.

अशा आहेत पिल्लांच्या नोंदी..

  • सर्वप्रथम २०१४ मध्ये ‘एसकेटी ०२’ वाघिणीचे छायाचित्र पंजाबी आणि टीमला कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून मिळाले.
  • त्यावर्षी या वाघिणीच्या हद्द क्षेत्रात एक पूर्ण वाढ होत आलेली दुसरी मादीही आढळून आली. सर्वसामान्यपणे एक वाघीण दुसऱ्या वाघिणीला आपली मुलगी असल्याशिवाय आपल्या हद्दीत वावरू देत नाही. त्यामुळे छायाचित्रित झालेली मादी ही ‘एसकेटी ०२’ वाघिणीची मुलगी असल्याचे मानून तिला ‘एसकेटी ०३’ असा क्रमांक देण्यात आला.
  • २०१५ साली ‘एसकेटी ०२’ वाघीण गवा खाताना कॅमेऱ्यात टिपली गेली. त्यावेळी तिच्यासोबत तीन पिल्लं आढळली.
  • २०१७ साली पुन्हा एकदा ‘एसकेटी ०२’ वाघिणीसोबत लहानग्या ३ पिल्लांची नोंद करण्यात आली.
  • यामधील ‘एसकेटी ०७’ ही मादी तिचीच मुलगी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
  • २०२१ साली ही मादी गोव्यातील म्हादाई अभयारण्यात आढळली. तर २०१५ साली ‘एसकेटी ०२’च्या पोटी जन्मास आलेली ‘एसकेटी ०२’ ही मादी आता प्रौढ झाली असून, तिच्यासोबत २०२४ साली तीन पिल्ले वावरताना दिसली.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (एसटीआर) आणि काली व्याघ्र प्रकल्प (केटीआर) यांच्यातील कॉरिडॉरचे संरक्षण करणे हे एसटीआरमधील वाघांच्या नैसर्गिक वसाहतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जरी सध्या एसटीआरमध्ये फक्त नर वाघ आहेत, तरी कॉरिडॉरमध्ये प्रजनन करणाऱ्या माद्यांची उपस्थिती हे एक सकारात्मक चिन्ह आहे आणि त्यामुळे माद्यांद्वारे एसटीआरची वसाहतदेखील होऊ शकते. - गिरीश पंजाबी, संशोधक, वाईल्डलाईफ काॅन्झर्व्हेशन ट्रस्ट
 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांगल्या वन व्यवस्थापनामुळे तिलारी ते राधानगरी, राधानगरी ते चांदोली, चांदोली ते कोयना हा भ्रमणमार्ग (कॉरिडॉर)चे संवर्धन झाल्याचे हे सिद्ध करते व भ्रमणमार्गाचे महत्त्व अधोरेखित करते. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Web Title: This tigress was recorded to have given birth to cubs three times during the period of SKP 02 residing in the Sahyadri Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.