सातारा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’!,
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:37 IST2025-05-06T16:36:47+5:302025-05-06T16:37:01+5:30
मे महिन्याची सुरुवात उच्चांकी तापमानाने..

सातारा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’!,
सातारा : जिल्ह्यातील उन्हाळा तापदायक ठरत असून मागील १० वर्षांत यंदाचा एप्रिल महिना सर्वाधिक ‘हाॅट’ ठरला आहे. तब्बल १२ दिवस सातारा शहराचा पारा ४० अंशावर गेला होता. कमाल तापमानाने ही ४१ अंशापर्यंत मजली मारली होती. तसेच माण, खटाव आणि फलटण तालुक्यातील पारा ४३ अंशापर्यंत पोहोचल्याने जनजीवनावर ही परिणाम झाला होता.
सातारा जिल्ह्याचे भाैगोलिक असे दोन भाग पडतात. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात उन्हाळ्यात कमाल तापमान वाढलेले असते. तर पश्चिमेच्या सातारा, पाटण, वाई, कऱ्हाड, महाबळेश्वर या तालुक्यातील पारा पूर्वेच्या मानाने कमी असतो. त्यातच महाबळेश्वर हे जागतिक पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण. महाबळेश्वरचा पारा ही उन्हाळ्यात वाढतो. ३७ अंशापर्यंत कमाल तापमान जाते. पण, पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिमेकडे कडक उन्हाळा नसतो. मात्र, मागील तीन वर्षांपासून तापमानात वाढ होत गेली आहे. पश्चिम भाग वगळता सर्वत्र पारा ४० ते ४३ अंशांदरम्यान राहतो. मात्र, यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरलेला आहे.
मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू झाला. त्याचवेळी पारा ३९ अंशापर्यंत पोहोचला होता. तर एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे सतत कमाल तापमानात वाढ होत गेली. सातारा शहर ही तापले. एप्रिलमध्ये कधीतरी शहरातील पारा ४० अंशावर जायचा. पण, यंदा तब्बल १२ वेळा सातारा शहरातील कमाल तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला.
८ एप्रिलपासून ४० अंशावर पारा जाण्यास सुरूवात झाली. त्यातच काही दिवस सतत उष्णतेची लाट ही दिसून आली. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कमाल तापमान कायम ४१ अंशापर्यंत जात होते. यामुळे मागील १० वर्षांतील यंदाचा एप्रिल महिना हाॅट ठरल्याचे सांगण्यात येत आहे. तर पूर्व भागातील पारा ही नेहमीच ४० अंशावर आहे. यामुळे मे महिना ही आणखी कडक राहण्याचा अंदाज आहे.
एप्रिलमधील कमाल तापमान सातारा शहर
दि. ८ एप्रिल - ४०.३
१५ एप्रिल - ४०.३
१६ एप्रिल - ४०.२
१७ एप्रिल - ४०.७
१८ एप्रिल - ४०.२
२२ एप्रिल - ४०.९
२३ एप्रिल - ४०.७
२४ एप्रिल - ४०.३
२६ एप्रिल - ४०.३
२८ एप्रिल - ४०.७
२९ एप्रिल - ४०.७
३० एप्रिल - ४०.७
मे महिन्याची सुरुवात उच्चांकी तापमानाने..
जिल्ह्यात सध्या ढगाळ वातारण निर्माण होत आहे. त्यामुळे कमाल तापमानात थोडा उतार आला आहे. पण, मे महिन्याची सुरुवातच उच्चांकी तापमानाने झाली. एक मे रोजी सातारा शहरात ४१.२ अंश तापमान नोंद झाले. हे दोन वर्षांतील उच्चांकी पारा ठरला आहे. पुढील काळात आणखी तापमान वाढीचा अंदाज आहे.
उष्माघाताने एकाचा मृत्यू..
माण तालुक्यात एप्रिल महिना कडक उन्हाचा होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास पारा ४३ अंशापर्यंत जात होता. रखरखीत उन्हाचा त्रास सर्वांनाच होत होता. यातच उष्माघातामुळे माण तालुक्यातीलच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर उन्हाळ्यामुळे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी उपचार केले जात आहेत.