Satara: घरफोडी, चोरीचे १७ गुन्हे नावावर असलेल्या चोरट्यास अटक
By नितीन काळेल | Updated: January 24, 2025 19:25 IST2025-01-24T19:24:40+5:302025-01-24T19:25:11+5:30
पोलिसांनी केले ७ गुन्हे उघडकीस

Satara: घरफोडी, चोरीचे १७ गुन्हे नावावर असलेल्या चोरट्यास अटक
सातारा : सातारा शहरातील दुकानात चोरी करणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली असून ७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या चोरट्याचे नाव संतोष रामचंद्र गावडे असे असून तो सातारा तालुक्यातील बेंडवाडीचा रहिवाशी आहे. तसेच त्याच्यावर घरफोडी, चोरीचे तब्बल १७ गुन्हे पोलिसांत नोंद आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ३० डिसेंबर रोजी सातारा शहरातील रविवार पेठेतील एका हाॅटेलमध्ये चोरी झाली होती. हाॅटेलमधून रोख रक्कम, मोबाइल चोरीस गेला होता. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. हा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी शहरातील घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना केली होती.
त्यानुसार सातारा शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेला रात्री दुकाने फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याची माहिती मिळाली. संशयावरुन सातारा तालुक्यातील संतोष रामचंद्र गावडे (रा. बेंडवाडी, पो. आसनगाव) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केल्यावर त्याने हाॅटेलमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. तसेच इतर माहितीही दिली.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार नीलेश यादव, सुनील मोहिते, सुजीत भोसले, नीलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम आदींनी सहभाग घेतला.