रस्ते खचल्याने मदत मिळेना...तळमळत जाताहेत जीव; ५ हजार जणांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 08:08 PM2021-07-24T20:08:50+5:302021-07-24T20:20:33+5:30

Satara Rain : कोयनानगर आणि मोरगिरी खोऱ्यातील या गावांवर कोसळलेल्या दरडींमुळे अनेक लोक घरातच गाडले गेले आहेत. या ठिकाणच्या अगोदरच दुर्गम असलेल्या गावांपर्यंत जाण्यासाठीचे रस्तेही अनेक ठिकाणी बंद झाले आहेत.

There is no help due to the erosion of roads ... Situation at Ambeghar, Mirgaon, Dhokawale in Satara | रस्ते खचल्याने मदत मिळेना...तळमळत जाताहेत जीव; ५ हजार जणांचे स्थलांतर

रस्ते खचल्याने मदत मिळेना...तळमळत जाताहेत जीव; ५ हजार जणांचे स्थलांतर

Next

कोयनानगर :  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मिरगाव, ढोकावळे, आंबेघर या गावांवर दरडी कोसळून झालेल्या आपत्तीत १८ हून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले आहेत. तर जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी यंत्रणा पोहचू शकत नसल्याने त्यांना तळमळत रस्त्यातच जीव सोडावा लागत आहे.

कोयनानगर आणि मोरगिरी खोऱ्यातील या गावांवर कोसळलेल्या दरडींमुळे अनेक लोक घरातच गाडले गेले आहेत. या ठिकाणच्या अगोदरच दुर्गम असलेल्या गावांपर्यंत जाण्यासाठीचे रस्तेही अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. काही ठिकाणचे पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे कोयना धरणात उतरून त्याठिकाणाहून मदत देण्याचा प्रयत्न एनडीआरएफचे जवान आणि प्रशासन करत आहे. मात्र, जोपर्यंत रस्ते होत नाहीत. तोपर्यंत या गावांना मदत पोहचविणे शक्य होत नाही. 

गावातील सुमारे साडे तीन हजारांहून अधिक जनावरे दगावली आहेत. मिरगावमधील १५० लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र, त्यांची जनावरे अजूनही त्याच ठिकाणी आहेत. त्यांना सोडून देण्यासाठी या लोकांना पुन्हा गावात जायचे आहे. मात्र, त्यांना जाता येत नव्हते. शनिवारी संध्याकाळी या गावात जाऊन जनावरांची दावी तोडून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

मिरगाव आणि ढोकावळे याठिकाणी शनिवारी संध्याकाळी जेसीबीच्या मदतीने दरडी आणि मातीचे ढिगारे बाजूला करत मार्ग काढणे सुरु आहे. ढोकावळे येथील १२५ ग्रामस्थांना चाफेर मिरगाव हायस्कूल येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर मिरगावमधील २६० ग्रामस्थांना प्राथमिक शाळेत आणि बाजे येथील गावाच्या बाजूने डोंगराचे कडे तुटल्याने त्यांना कोयनेतील हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले आहे.

ढोकावळे येथील हरीबा रामचंद्र कांबळे, पूर्वा गौतम कांबळे आणि राहीबाई धोंडीबा कांबळे हे तिघेजण मातीत गाडले गेले आहेत. तर सुरेश भांबू कांबले याला ग्रामस्थांनी बाहेर काढले आहे. मात्र, उपचार न मिळाल्याने ग्रामस्थांसमोरच त्यांनी प्राण सोडला. मृतांवर त्याचठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत.

मिरगावमधील मुक्ता मनोज बाकाडे ( वय १० ) हिचा मृतदेह सापडला आहे. तर वसंत धोंडिबा बाकाडे (५५), कमल वसंत बाकाडे (५०), देवजी बापू बाकाडे (७५), शेवंताबाई देवजी बाकाडे (७०), यशोदा केशव बाकाडे (७०), युवराज जयवंत बाकाडे (५), तर आनंदा रामचंद्र बाकाडे (४९), मंगल आनंदा बाकाडे (४५), भूषण आनंदा बाकाडे (१८) व शितल आनंदा बाकाडे (१५) या एकाच कुटुंबातील चौघां जणांचा मृत्यू झाला आहे. मिरगाव येथील ६, ढोकावळे येथील ४ तर आंबेघर येथील १० जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तर अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात लोकांना वाचवले
एनडीआरएफच्या जवानांनाही दुर्घटनास्थळावर जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. रस्ते करत त्यांना त्याठिकाणी पोहचावे लागत आहे. तरी देखील एनडीआरएफच्या जवानांनी कोयनेच्या बँक वॉटरमध्ये उतरून प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊन लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एवढे धारिष्ट हे फक्त या जवानांमध्येच पाहायला मिळते.

Web Title: There is no help due to the erosion of roads ... Situation at Ambeghar, Mirgaon, Dhokawale in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.