"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:19 IST2025-10-28T19:17:54+5:302025-10-28T19:19:01+5:30
Phaltan Doctor News: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, असे ते म्हणाले.

"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
Phaltan Doctor Udayanraje Bhosale: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटना घडायला नको. मला आज मुख्यमंत्र्यांशी संपर्क करता आला नाही, पण मी त्यांच्याशी बोलणारच आहे. आरोपींना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही, अशी मागणी उदयनराजेंनी केली.
उदयनराजे भोसले यांनी डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. उदयनराजे म्हणाले, "चौकशी सुरू आहे. खरं काय, खोटं काय मला माहिती नाही. पण जो कुणीही असेल, तर पोलिसांनी आणि शासकीय यंत्रणेनं व्यवस्थित चौकशी करावी. असे अनुचित प्रकार होता कामा नये."
"कुणी जरी असेल, तरी शिक्षा झाली पाहिजे. सातारा जिल्ह्याची परंपरा जर आपण पाहिली तर या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. चव्हाण साहेबांच्या माध्यमातून असेल. असे नेते होऊन गेले आहेत", असे ते म्हणाले.
ज्यांना याबद्दल माहिती, त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावी
"मी मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे. मला आज त्यांच्याशी संपर्क करता आला नाही. पण, मला खात्री आहे की, आपली यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. माझी विनंती राहील की, ज्या भागात ही घटना घडली. त्या भागातील ज्या लोकांना याबद्दल माहिती असेल, त्यांनी ती माहिती तपास करणाऱ्या यंत्रणांना द्यावी. त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही", अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली.
गळफास घेतल्यामुळे डॉक्टर तरुणीचा मृत्यू
हॉटेलमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. तरुणीचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मयत तरुणीच्या शरीरावर इतर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत.
डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहून फलटणमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. हातावरील सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदनेने चार वेळा बलात्कार केल्याचा, तसेच प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा उल्लेख केलेला आहे.