घडतंय बिघडतंय: कऱ्हाडमध्ये भाजप-शिंदेसेनेचा सवता सुभा, स्वबळावर लढण्याची हवी मुभा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:54 IST2025-05-21T15:52:41+5:302025-05-21T15:54:21+5:30

भाजपची पायी तर शिंदे गटाकडून स्वतंत्र तिरंगा मोटारसायकल रॅली

There are indications that BJP Shinde Sena will contest the upcoming elections in Karad on their own | घडतंय बिघडतंय: कऱ्हाडमध्ये भाजप-शिंदेसेनेचा सवता सुभा, स्वबळावर लढण्याची हवी मुभा!

घडतंय बिघडतंय: कऱ्हाडमध्ये भाजप-शिंदेसेनेचा सवता सुभा, स्वबळावर लढण्याची हवी मुभा!

प्रमोद सुकरे 

कऱ्हाड : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ देशभर सगळीकडे तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. कराडातही रविवारी भाजपने तिरंगा रॅली काढली तर मंगळवारी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राजेंद्रसिंह यादव यांच्या पुढाकारातून  मोटारसायकल बाईक तिरंगा रॅली काढण्यात आली. यामुळे महायुतीतील घटक पक्षातही तिरंगा रॅलीत सवता सुभा पाहायला मिळत आहे. त्यातून आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढण्याची मुभा हवी असेच संकेत दिले जात आहेत.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्या माध्यमातून मोठे यश प्राप्त केले. म्हणूनच त्या सैनिकांच्या सन्मानार्थ व आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. पण या तिरंगा रॅलीचे आयोजन करताना महायुतीतील घटक पक्षात मात्र एकवाक्यता नसल्याचे समोर येत आहे.

रविवारी कराड शहरात भाजपने ही तिरंगा रॅली काढली. यात कराड दक्षिणचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले , कराड उत्तर चे आमदार मनोज घोरपडे व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पण या रॅलीत राज्यात आणि देशात त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या घटक पक्षातील नेते मात्र कोठेच दिसले नाहीत.तर मंगळवारी शिवसेनेच्या मोटारसायकल बाईक तिरंगा रॅलीला राजेंद्रसिंह यादव, रणजीत पाटील व त्यांचे शिवसैनिक दिसले.

नजीच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महायुतीचे नेते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याच्या भाषा करीत आहेत. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या ते पचनी पडत नसल्याचे दिसते. भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी धडपडत आहेत.त्याचाच भाग म्हणून तिरंगा रॅलीचे आयोजन एकत्रित न होता स्वतंत्रपणे होताना दिसत आहे.

'राष्ट्रवादी' थंडच ..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. कराड तालुक्यात त्यांच्या पक्षाची ताकद चांगली आहे. किंबहुना रयत सहकारी साखर कारखाने अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना पक्षप्रवेश देऊन ती अधिक वाढली आहे. पण तिरंगा रॅली बाबत राष्ट्रवादी अजून थंडच दिसत आहे.

प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार

खरंतर राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्याशिवाय पक्षाचे चिन्ह, पक्षाचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत हे राजकीय नेते चांगलेच जाणतात. म्हणून तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरच लढल्या जाव्यात अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना दिसते.

Web Title: There are indications that BJP Shinde Sena will contest the upcoming elections in Karad on their own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.