‘त्यांना’ हवा प्रवासाचा आधार! डे केअर सेंटरचं दुखणं : संवेदनशील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराची गरज-शिक्षणाच्या प्रवाहात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:17 IST2018-09-11T00:16:29+5:302018-09-11T00:17:48+5:30
जन्मत:च अपंग असलेल्या पाल्याच्या काळजीसाठी शासनाने डे केअर सेंटर सुरू केलं; पण भाकरीच्या चंद्रासाठी बाहेर पडणाऱ्या पालकांना आपल्या विशेष पाल्यासाठी द्यायला वेळ नाही.

‘त्यांना’ हवा प्रवासाचा आधार! डे केअर सेंटरचं दुखणं : संवेदनशील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराची गरज-शिक्षणाच्या प्रवाहात...
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : जन्मत:च अपंग असलेल्या पाल्याच्या काळजीसाठी शासनाने डे केअर सेंटर सुरू केलं; पण भाकरीच्या चंद्रासाठी बाहेर पडणाऱ्या पालकांना आपल्या विशेष पाल्यासाठी द्यायला वेळ नाही. या बालकांना घरातून सेंटरपर्यंत आणण्याची सोय होणं गरजेचं बनलं आहे, त्यासाठी समाजातील संवेदनशील दानशूर व्यक्तींचा पुढाकार महत्त्वाचा आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले आणि नगरपालिकेच्या शाळा क्रमांक २० मधील दोन खोल्यांमध्ये हे सेंटर सुरू आहे. यामध्ये सध्या १४ मुलं कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी सेलिब्रल पारसीग्रस्त आहेत. जन्मत:च मेंदूतील रक्तवाहिनीवर पडलेल्या अतिरिक्त दाबामुळे शरीराच्या एका भागाच्या हालचाली पूर्णपणे थांबतात. काही व्यायाम करून या वाहिनीला रक्त पुरवठा देण्याचं काम सुरू होऊ शकतं; पण ही प्रक्रिया वेळखाऊ आहे.
त्यामुळे रोजच्या रोज पालकांना आपल्या मुलासाठी तीन ते चार तास वेळ काढणं केवळ अशक्य होत आहे. घरात असलेल्या दुसऱ्या सुदृढ बालकाकडे यामुळे दुर्लक्ष होत असल्याची भावना पालकांच्या मनात दिसते. परिणामी पारसीग्रस्त पाल्याला घरात कोंडून ठेवण्याचा पर्याय पालक नाईलाजाने स्वीकारतात.
या सेंटरची सुरुवात झाली, त्यावेळी शहर व परिसरातील सुमारे २५ हून अधिक विद्यार्थी या सेंटरमध्ये येत होते. मात्र, वाहनाची सोय अवघ्या दोन महिन्यांत संपुष्टात आली आणि या विद्यार्थ्यांचं सेंटरकडं येणंही बंद झालं. ज्या विद्यार्थ्यांनी येथे नियमित प्रशिक्षण आणि उपचार घेतले, त्यांच्यात सकारात्मक बदल दिसून आले. मात्र, शहरात अजूनही शेकडो मुलं या उपचारांपासून कोसोदूर आहेत. केवळ वाहन व्यवस्था नसल्यामुळे या उपचारापासून लांब राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सेंटरकडे आणण्यासाठी गरज आहे, समाजातील संवदेनशील मनाच्या पुढाकाराची!
डे केअर सेंटरचे गुणवंत विद्यार्थी
शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या डे केअर सेंटरमध्ये तनीश फडतरे, श्रद्धा मोरे, आम्मारा महापुळे, जान्हवी महाडिक, रिदा बागवान, अनिकेत जाधव, राजेश निकम, अनन्या गायकवाड, प्रथमेश शेळके, वरद इनामदार, अर्णव रासकर, हर्षवर्धन भोसले, विहान शेलार, दीपक गायकवाड या १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. यातील काही विद्यार्थी घरगुती स्वरुपात स्वयंरोजगार करण्याचं स्वतंत्र प्रशिक्षण घेत आहेत.
या गटातील बालकांसाठी सुरू झालं केंद्र
पालकांच्या अतिकाळजीमुळे अद्याप शाळेत दाखल न झालेली बालके
शाळेत दाखल झालेली; मात्र वर्गात समायोजनास अडथळा येणारी बालके
अपंगत्वाच्या तीव्रतेमुळे घरीच असलेली बालके
विखुरलेली बालके तसेच एकाच गावात एकापेक्षा अधिक असणारी बालके