Satara: मलकापुरात उड्डाणपुलालगतच्या पुलाचे काम निकृष्ट, नागरिकांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:17 IST2025-07-19T18:16:46+5:302025-07-19T18:17:14+5:30

ना रोलिंग, ना सॉइल कॉम्पॅक्टर, ना व्हायब्रेटर!

The work of the bridge near the flyover in Malkapur Satara is poor | Satara: मलकापुरात उड्डाणपुलालगतच्या पुलाचे काम निकृष्ट, नागरिकांचा आरोप 

Satara: मलकापुरात उड्डाणपुलालगतच्या पुलाचे काम निकृष्ट, नागरिकांचा आरोप 

माणिक डोंगरे

मलकापूर : मलकापुरात उड्डाणपुलाच्या नांदलापूरकडील भराव पुलाच्या कामात नुसताच मुरूम आणून फक्त मटेरियलचा डेपो मारत आहेत. रोलिंग, सॉइल कॉम्पॅक्टर, व्हायब्रेटर असे तंत्रशुद्ध काम दिसत नाही. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. तांत्रिक कामाला बगल देत फक्त भराव घालत असल्याचा थेट आरोप या कामातील जाणकार मंडळींनी केला आहे.

पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सहापदरीकरणांतर्गत कऱ्हाड ते मलकापूरदरम्यान साडेतीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव पूल तयार करावा लागणार आहे. सध्या विरंगुळा हॉटेल ते नांदलापूर या एक कलोमीटर अंतरात भराव पुलाचे काम सुरू आहे. या भराव पुलात मुरूम आणून ओतला जात आहे. 

ओतलेल्या मुरमाला रोलिंग, सॉइल कॉम्पॅक्टर व व्हायब्रेटर न करता केवळ जेसीबीने पसरला जात आहे. अशा पद्धतीने भराव केल्यास भविष्यात तो आरण्याची दाट शक्यता आहे. असे यापूर्वी भराव पुलाची कामे केलेल्या जाणकार मंडळींकडून सांगण्यात येत आहे. भरावाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या भराव पुलाच्या कामाचा दर्जा तपासावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

केवळ पोकलेन, जेसीबी व लहान व्हायर्बेटर रोलरचा वापर..

नांदलापूर ओढा पुलाचा स्लॅब झाल्यावर साइडचे खड्डे भरताना पोकलेन व जेसीबीने माती, मुरुम भरला. मधेमधे लहान व्हायर्बेटर रोलर मारला आणि बुजवून टाकले. अशा पद्धतीने वडाप काम करत असल्यामुळे भरावाच्या कामातील दर्जाबाबत नागरिक शंका उपस्थित करत आहेत.

२००२ मध्ये मलकापुरात भराव पूल केला होता. आम्ही एल अँड टीकडे भरावाचे काम करत होतो. मुरमाचा ३ फुटांचा थर देऊन सॉइल कॉम्पॅक्टर मशीन ४ ते ५ राऊंड फिरवून तो सव्वा फूट केला जायचा. मग त्याचे सॅम्पल टेस्ट करून पुढचा थर लागायचा. या पद्धतीने केलेले काम कधीच मोठ्या पावसाने खचले नाही, की वाहून गेले नाही. - सतीश पाटील, जाणकार कंत्राटदार

Web Title: The work of the bridge near the flyover in Malkapur Satara is poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.