संजय पाटीलकऱ्हाड : शहरातील कोल्हापूर नाक्यापासून नांदलापूरपर्यंत साडेतीन किलोमीटरमध्ये उड्डाणपूल उभारला जातोय. या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले होते. मात्र, अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला असून, त्यानुसार बहुतांश कामे मार्गी लागल्याने अपघातांचे प्रमाण घटले आहे.कऱ्हाडातील कोल्हापूर नाका हा सुरुवातीपासूनच अपघाती क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथील अपघात रोखण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता येण्यासाठी आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाअंतर्गत कोल्हापूर नाक्यापासून नांदलापूरपर्यंत ‘सिंगल पिलर’चा उड्डाणपूल उभारला जात आहे. मात्र, या कामामुळे ठिकठिकाणी अडथळे निर्माण होऊन वाहतूक संथगतीने होत आहे. तसेच स्थानिक आणि महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गावरून होत असल्याने किरकोळ व गंभीर अपघातही वाढले होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला सुरक्षात्मक उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्या असून गत महिनाभरात गंभीर, तसेच जीवघेण्या अपघातांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. वाहतूकही सोयिस्कर झाल्याचे दिसून येत आहे.
पूर्ण झालेल्या उपाययोजना
- कऱ्हाडात प्रवेशमार्गावर उंचीरोधक बसवले.
- सिमेंट ब्लॉकवर रेडियम लावले.
- अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीचे फलक उभारले.
- कोल्हापूर नाका, मलकापूर फाटा, ढेबेवाडी फाटा येथे पांढरे पट्टे मारले.
- कृष्णा हॉस्पिटल येथे ब्लिंकर्स बसविले.
- गंधर्व हॉटेलसमोरील छेदरस्ता बंद केला.
- कोयना मोरी, संगम हॉटेल, ढेबेवाडी फाटा, मलकापूर फाटा, नांदलापूर फाटा येथे वॉर्डन नेमले.
- दोन्ही बाजूंच्या उपमार्गांवरील खड्डे मुजवले.
- ढेबेवाडी फाट्यावरील धोकादायक खड्डा मुजवला.
- कोयना वसाहत, ढेबेवाडी फाटा येथे गतिरोधक उभारले.
प्रलंबित उपाययोजना
- ढेबेवाडी फाटा येथे रुग्णवाहिका ठेवणे
- बंद वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन ठेवणे
- पाचवड फाटा येथे पाण्याचा निचरा करणे
- गटारांची स्वच्छता करणे
- सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्स लावणे
- नवरंग हॉटेल, दुर्गा हॉटेल, मलकापूर फाटा येथे गतिरोधक उभारणे
वळण रस्ता बदलण्याची शिफारसकोल्हापूर बाजूकडून आलेल्या वाहनांना कऱ्हाडात प्रवेश करण्यासाठी कोयना मोरी येथे वळणमार्ग करण्यात आला आहे. येथे अवजड वाहतूक रोखण्यासाठी उंचीरोधकही उभारलेत. मात्र, कऱ्हाडातून बाहेर पडणाऱ्या वाहनांचा वळणमार्गही जवळच असल्याने या ठिकाणी कोंडी होत आहे. परिणामी, कोयना मोरी येथील वळणमार्ग बदलून तो बागवान ट्रान्सपोर्टसमोर घेण्याची मागणीही पोलिसांनी केली आहे.
कऱ्हाडात महामार्गावरील अपघात टाळण्याबाबत आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार बहुतांश कामे झाली आहेत. प्रलंबित कामांबाबत कार्यवाही सुरू आहे. या उपाययोजनांमुळे अपघात कमी झाले असून, वाहतूक सुरक्षित होत आहे. - संदीप सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, कऱ्हाड