‘स्पेस ऑन व्हील्स’ने भारावले विद्यार्थी, साताऱ्यातील पाच हजार विद्यार्थ्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:01 IST2025-01-23T12:01:33+5:302025-01-23T12:01:56+5:30
सातारा : परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी ‘स्पेस ऑन व्हील्स’ या बसमधून इस्रोने सादर केलेल्या उपक्रमांचा अनुभव घेतला. विविध शाळांच्या ...

‘स्पेस ऑन व्हील्स’ने भारावले विद्यार्थी, साताऱ्यातील पाच हजार विद्यार्थ्यांची भेट
सातारा : परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी ‘स्पेस ऑन व्हील्स’ या बसमधून इस्रोने सादर केलेल्या उपक्रमांचा अनुभव घेतला. विविध शाळांच्या तब्बल ५ हजार विद्यार्थ्यांनी या बसला भेट देऊन अनोख्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.
साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षणसंस्थेचे सहसचिव बंडू पवार होते, तर संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराजा सयाजीराव विद्यालय, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, सातारा प्रायमरी शाळा, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, युनिव्हर्सल विद्यालय आणि मूकबधिर विद्यालय या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी ‘स्पेस ऑन व्हील्स’ या बसमधील इस्रोच्या विविध उपक्रमांच्या प्रतिकृती पाहून त्यांची माहिती जाणून घेतली. शहरातील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या अनोख्या शिक्षण प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली. प्राचार्य दिनेश दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. आर. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी विज्ञान शिक्षक संजय गळवे, नानासाहेब निकम, राज्य समन्वयक मीना मालगावकर, माजी प्राचार्य डॉ. प्रमिला लाहोटी, विज्ञान भारती पुणेचे क्षेत्रीय संघटन मंत्री प्रसाद जी आदी उपस्थित होते.
उपगृहांच्या प्रतिकृती पाहून विद्यार्थी झाले थक्क..
‘स्पेस ऑन व्हील्स’ या उपक्रमांतर्गत आलेल्या बसमध्ये इस्त्रोद्वारानिर्मित विविध प्रक्षेपक, उपगृहांच्या प्रतिकृती व त्यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच भारताच्या मंगळयान, चंद्रयान, आर्यभट्ट, रोहिणी, भास्कर आदी उपगृहांच्या दळणवळणांची व्यवस्था, प्रक्षेपण तळ, पृथ्वीवरून या उपगृहांशी संवाद ठेवणारी यंत्रणा याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. टीव्हीवर पाहिलेले उपगृहांच्या प्रतिकृती प्रत्यक्षात पाहून विद्यार्थी थक्क झाले.