डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण; साताऱ्यातील ‘त्या’ ज्ञानमंदिराला मिळावी ‘आंतरराष्ट्रीय’ झळाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:09 IST2025-11-07T19:07:38+5:302025-11-07T19:09:36+5:30
राज्यात हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण; साताऱ्यातील ‘त्या’ ज्ञानमंदिराला मिळावी ‘आंतरराष्ट्रीय’ झळाळी
सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात ज्या ऐतिहासिक भूमीतून झाली, त्या सातारा शहरासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांनी येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता.
या घटनेला आज १२५ वर्ष पूर्ण होत असून, राज्यात हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून, ज्या शाळेत बाबासाहेबांनी ज्ञानाचे पहिले धडे घेतले, त्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून विकसित करावी, हीच बाबासाहेबांना मानवंदना ठरेल, अशी अपेक्षा सातारकरांनी व्यक्त केली.
शाळेच्या अभिलेखात आजही ती नोंद..
ज्यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ आणि जगातला सर्वांत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जाते ते बाबासाहेब प्रतापसिंह हायस्कूलचे विद्यार्थी होते. आजही या शाळेच्या प्रवेश अभिलेखात ‘भीवा रामजी आंबेडकर’ या नावाची १९१४ क्रमांकावर नोंद आहे. प्रवेश घेताना त्या शाळेच्या मातीच्या कणालाही कल्पना नसेल की, हा विद्यार्थी भविष्यात जगातील आदर्श विद्यार्थी ठरेल. पण, बाबासाहेबांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर हे स्वप्न खरे केले. याच मातीतून त्यांना प्रज्ञेच्या आणि विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळ मिळाले आणि आज हे हायस्कूल केवळ सातारकरांचेच नाही, तर या जगाचे प्रेरणास्थान ठरले आहे.
हीच खरी मानवंदना ठरेल..
२०१७ पासून राज्य सरकारने ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र, आज केवळ हा दिन साजरा करून थांबणे पुरेसे नाही. ज्या आमने बंगल्यात बाबासाहेब राहत होते, त्या वास्तूचे स्मारक उभे करावे. तसेच ज्या शाळेत ते शिकले, त्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून विकसित करावे. असे झाल्यास ही शाळा विद्यार्थ्यांसाठी जागतिक प्रेरणास्थान ठरेल आणि हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली खरी मानवंदना ठरेल.
ज्या प्रमाणे देशात शिक्षण दिन, वाचन दिन साजरा केला जातो, त्याप्रमाणे देशात बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हायला हवा. यासाठी शासनाला ७५ लाख पत्रांच्या माध्यमातून साद घातली जाणार आहे. ज्या शाळेत बाबासाहेबांचे शिक्षण झाले ती शाळा आंतराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून विकसित करायला हवी. - अरुण जावळे, प्रवर्तक, शाळा प्रवेश दिन