Satara: म्हाळसा-खंडोबा यांचा शाही विवाह सोहळा २ जानेवारीला पालला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:45 IST2025-12-18T19:44:45+5:302025-12-18T19:45:15+5:30
शाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर होणार. यासाठी लाखो वऱ्हाडी येणार

Satara: म्हाळसा-खंडोबा यांचा शाही विवाह सोहळा २ जानेवारीला पालला
उंब्रज : ‘पाल (ता. कराड) येथे श्री खंडोबा-म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा २ जानेवारी रोजी गोरज मुहूर्तावर होणार आहे. यासाठी लाखो वऱ्हाडी येणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी,’ असे निर्देश प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिले.
पाल येथे खंडोबा यात्रेच्या पहिल्या पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार बी. के. राठोड, देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, मोटार वाहन अधिकारी धनंजय हिले, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, देवस्थानचे संचालक, यात्रा समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी यात्रा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी भाविकांनी देवस्थान ट्रस्ट, यात्रा समिती व ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. यात्रेच्या नियोजनात कालानुरूप बदल करण्यात आले असून, भाविकांच्या स्वागतासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एसटी स्टँडचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.
तहसीलदार कल्पना ढवळे यांनी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी व नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांची दखल घ्यावी, असे सांगितले. यात्रेदरम्यान ३७० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून, महावितरणकडून ३० कर्मचाऱ्यांची टीम तैनात राहणार आहे. तसेच अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आप्पासाहेब खंडाईत यांनी आभार मानले.