Satara Politics: मनोमिलनाची बैठक झाली होती, पण 'ती' अट मला मान्य नव्हती; संजीवराजेंची सष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:49 IST2025-11-06T12:49:10+5:302025-11-06T12:49:54+5:30
'त्यामुळे जे काय करायचे ते आम्ही तिघे बंधू मिळून करू'

Satara Politics: मनोमिलनाची बैठक झाली होती, पण 'ती' अट मला मान्य नव्हती; संजीवराजेंची सष्टोक्ती
फलटण : ‘होय, मी भाजपमध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव विरोधकांकडून आला होता आणि यावर आमची समोरासमोर बैठकही झाली होती, अशी सष्टोक्ती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणानंतर फलटणचे राजकारण पेटले असून, या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत ‘लक्ष्मी विलास’ या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत संजीवराजे यांनी ही कबुली दिली.
या बैठकीतील चर्चेचा तपशील उघड करताना संजीवराजे म्हणाले, ‘विरोधकांनी माझ्यासमोर भाजपात प्रवेश करण्याची अट ठेवली होती, परंतु त्यांनी फक्त मी एकट्यानेच प्रवेश करावा, अशी मुख्य अट घातली. ही अट मला मान्य नव्हती. आमचे राजकारण हे पूर्वीपासून रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्यामुळे जे काय करायचे ते आम्ही तिघे बंधू मिळून करू. फक्त माझा प्रवेश करणे हा निर्णय गटासाठी योग्य नव्हता म्हणून तो विषय लांबणीवर पडला.
यापूर्वी रणजितसिंह यांनी जाहीर सभा आणि पत्रकार परिषदेत मनोमिलनाची चर्चा झाल्याचे व समोरासमोर बैठक झाल्याचे कबूल केले होते. आता संजीवराजे यांनीही त्याला दुजोरा दिल्याने, फलटणच्या राजकारणातील खळबळ अधिक वाढली आहे.