पालिकेत नगराध्यक्ष पदग्रहणावेळी सातारा ‘महापालिके’ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:14 IST2025-12-27T19:14:37+5:302025-12-27T19:14:47+5:30
पुढची निवडणूक महापालिका म्हणून लढविण्याचे संकेत

पालिकेत नगराध्यक्ष पदग्रहणावेळी सातारा ‘महापालिके’ची घोषणा
सातारा : ‘सातारा शहराचा कायापालट करून नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजवर झालेला विकास आणि आगामी पाच वर्षांतील आमचे ठोस नियोजन पाहता, साताऱ्याची पुढची निवडणूक ही नगरपालिका म्हणून नाही, तर महापालिका म्हणूनच लढली जाईल,’ असे स्पष्ट संकेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे येणाऱ्या पाच वर्षांत साताऱ्याची वाटचाल महापालिकेच्या दिशेने सुरू होणार असल्याचे निश्चित झाले.
सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पदभार स्वीकारला. या स्वागत समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार उदयनराजे भोसले, मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आज सातारकरांना त्यांचे लोकनियुक्त प्रतिनिधी मिळाले. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने निधीचा ओघ कमी पडणार नाही. येणाऱ्या २५ फेब्रुवारीला राज्याच्या बजेटमध्ये साताऱ्यासाठी पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी निर्मूलन आणि आधुनिक मंडई यासह अन्य विकासकामांचे प्रस्ताव तातडीने मंत्रालयात पाठवण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक नगरसेवकाने केवळ प्रभागापुरता विचार न करता शहर म्हणून काम करावे, जेणेकरून महापालिकेचा दर्जा मिळवणे सुलभ होईल.
मुख्याधिकारी विनोद जळक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अविनाश कदम, दत्ता बनकर, मनोज शेंडे, धनंजय जांभळे, अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे, सिद्धी पवार, आशा पंडित, विजय देसाई, भारती शिंदे, मुक्ता लेवे, विजय काटवटे, भाजप शहर अध्यक्ष अविनाश खर्शीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लोकांच्या अपेक्षांना तडा जाऊ देऊ नका : उदयनराजे
खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात याच सभागृहातून झाली. लवकरच आपण नगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीत प्रवेश करणार आहोत. मात्र, इमारत कितीही मोठी असली, तरी सातारकरांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास त्यापेक्षा मोठा आहे. समाजसेवा हाच आमचा निवडणुकीचा निकष होता आणि तोच कामातही दिसायला हवा. शहराच्या हितासाठी आम्ही दोघेही सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
सातारकरांसाठी कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण करून शहराला २४ बाय ७ पाणीपुरवठयाला प्राधान्य देणार आहे. नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि पारदर्शक कारभार देणे, हे आमच्या कारभाराचे मुख्य सूत्र असेल. - अमोल मोहिते, नूतन नगराध्यक्ष, सातारा.