वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रुग्णालयात केली तोडफोड, साताऱ्यातील फलटण येथील घटना; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 19:14 IST2023-01-25T12:08:10+5:302023-01-25T19:14:11+5:30
संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तवणुकीमुळे सर्व कर्मचारी वैतागले

वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रुग्णालयात केली तोडफोड, साताऱ्यातील फलटण येथील घटना; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
नसीर शिकलगार
फलटण : वादग्रस्त वागणे असलेल्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची दारे खिडक्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. मात्र याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकारामुळे उपजिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली.
गेल्या चार वर्षापासून फलटण उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरु आहे. अनेक वेळा रुग्णालयाच्या कारभाराबाबत तक्रार करून देखील याची दखल घेतील जात नाही. चार वर्षांपूर्वी या रुग्णालयात बदलून आलेल्या संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तवणुकीमुळे सर्व कर्मचारी वैतागले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणे, कामावर कधी तरी येणे असे वागणे संबंधित अधिकाऱ्याचे आहे.
काल रात्री संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने शिमगा करीत उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची तोडफोड केली. विक्षिप्त स्वभावाच्या या अधिकाऱ्याला सर्वजण वैतागले असून रुग्णालयातील महिला कर्मचारी व रुग्ण भीतीने ग्रासले गेले आहेत. शासकीय मालमत्तेची तोडफोड करून सुद्धा याप्रकरणी अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची तोडफोड केल्याने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिले आहेत.