परदेशी पर्यटकाची माहिती दिली नाही, महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल चालकावर केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 14:01 IST2024-02-12T14:01:01+5:302024-02-12T14:01:40+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील बसस्थानकाशेजारील पॅनोरमा हॉटेलमध्ये ०७ फेब्रुवारी रोजी मेंगीन लेक्रेलक्स प्रास्टेऊ (रा. पॅरिस, फ्रान्स) यांना राहण्यासाठी जागा ...

परदेशी पर्यटकाची माहिती दिली नाही, महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल चालकावर केली कारवाई
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील बसस्थानकाशेजारील पॅनोरमा हॉटेलमध्ये ०७ फेब्रुवारी रोजी मेंगीन लेक्रेलक्स प्रास्टेऊ (रा. पॅरिस, फ्रान्स) यांना राहण्यासाठी जागा दिली. मात्र, याची माहिती पोलिसांना चोवीस तासांत न दिल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वरमध्ये फ्रान्समधील पर्यटकाला आर्थिक मोबदल्यामध्ये हॉटेलमध्ये राहण्यास देऊन या परदेशी पर्यटकाची माहिती चोवीस तासांत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात कळविणे बंधनकारक असताना हॉटेल चालकाने कोणतीही माहिती कळविली नाही. तसेच, परकीय नागरिकांच्या आगमनाचा सी फॉर्म भरून पोलिस ठाणे अथवा पोलिस अधीक्षक कार्यालय, सातारा यांना दिला नाही.
यामुळे हॉटेल चालक सुनील भाऊ ढेबे (वय ३६, रा. महाबळेश्वर) याच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८ सह विदेशी व्यक्ती अधिनियम कलम १४ क प्रमाणे महाबळेश्वर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलिस हवालदार वैभव शामराव भिलारे यांनी दिली.
महाबळेश्वरमधील हॉटेल चालक-मालकांनी आपल्या हॉटेलला येणारे परदेशी नागरिक यांचा सीफॉर्म ऑनलाइन भरून तो पोलिस स्टेशनला जमा करणे बंधनकारक आहे. हॉटेल अनुषंगाने असलेल्या सर्व नियमांचे सर्वांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल चालक-मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - यशवंत नलावडे, पोलिस निरीक्षक, महाबळेश्वर