साहित्य संमेलनात उमलले बहीण-भावाचे अजरामर नाते! कवी संमेलनात पार पडला भावुक सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:43 IST2026-01-03T13:41:47+5:302026-01-03T13:43:39+5:30
निमित्त होते प्रसिद्ध कवी डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी आपल्या हक्काचा सन्मान थोरल्या बहिणीच्या चरणी अर्पण करण्याचे. या एका भावुक क्षणाने संपूर्ण संमेलन परिसराचे डोळे पाणावले.

साहित्य संमेलनात उमलले बहीण-भावाचे अजरामर नाते! कवी संमेलनात पार पडला भावुक सोहळा
छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : साहित्य संमेलनाचे व्यासपीठ म्हणजे शब्दांचा उत्सव, पण साताऱ्यातील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी शब्दांच्या पलीकडची एक ‘मूक कविता’ रसिकांनी अनुभवली. निमित्त होते प्रसिद्ध कवी डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी आपल्या हक्काचा सन्मान थोरल्या बहिणीच्या चरणी अर्पण करण्याचे. या एका भावुक क्षणाने संपूर्ण संमेलन परिसराचे डोळे पाणावले.
संमेलनातील ‘बा.सी. मर्ढेकर कवी कट्ट्यावर’ गुरुवारी डॉ. सोनावणे यांनी आपली ‘मातीमूळ’ ही कविता सादर केली. मातीशी असलेल्या नात्याचा उलगडा करणाऱ्या या कवितेने रसिक आधीच भारावले होते. मात्र, खरा परमोच्च क्षण तेव्हा आला, जेव्हा साहित्य महामंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. स्वतःचा सत्कार स्वीकारण्यापूर्वी डॉ. सोनावणे यांनी अत्यंत भावुक होत संयोजकांना ‘माझी कविता ऐकण्यासाठी लोणी (ता. खटाव) येथून आलेल्या थोरल्या बहिणीचा सन्मान व्हावा, अशी विनंती केली. कवीच्या या आर्जवाचा मान राखत मंगल मनोहर निकम ( ६५) यांचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला.
एमए., पीएच.डी. सारखी उच्च पदवी आणि ७५ हून अधिक शोधनिबंधांची शिदोरी गाठीशी असलेल्या एका
विद्वान प्राध्यापकाने यशाचे श्रेय ज्यावेळी ग्रामीण भगिनीला दिले, तेव्हा सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी थोरल्या बहिणीचा सन्मान करून हेच सिद्ध केले की, नात्यांची ऊब ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी असते. या प्रसंगाने कवी कट्ट्याची उंची वाढवली. आम्हा सर्व रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला. हा केवळ सत्कार नव्हता, तर भारतीय संस्कृतीतील कृतज्ञतेचा आविष्कार होता.
प्रा. शिवप्पा पाटील, यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, सातारा
साताऱ्यातील कवी कट्ट्यावर मंगल मनोहर निकम यांचा सत्कार करण्यात आला.