Satara: अजिंक्यताऱ्यावरील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याला संवर्धनाची प्रतीक्षा!

By सचिन काकडे | Updated: May 19, 2025 13:53 IST2025-05-19T13:53:04+5:302025-05-19T13:53:28+5:30

अशा प्रकारचा पिंजरा भारतात इतर कोणत्याही ठिकाणी अजून तरी आढळून आला नसल्याने हा इतिहास काळातील जंगली श्वापदे पकडण्याचा एकमेव पिंजरा ठरावा

The historic stone cage at Fort Ajinkyatara in Satara awaits conservation | Satara: अजिंक्यताऱ्यावरील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याला संवर्धनाची प्रतीक्षा!

Satara: अजिंक्यताऱ्यावरील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याला संवर्धनाची प्रतीक्षा!

सचिन काकडे

सातारा : साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, या किल्ल्यावर आजही इतिहासाच्या पाऊलखुणा विखरून पडल्या आहेत. खालच्या मंगळाईदेवी मंदिराच्या आवारात असलेला जंगली श्वापद पकडण्याचा पिंजराही त्यापैकीच एक. गेली कैक वर्षे हा पिंजरा संवर्धनाच्या प्रतीक्षेत असून, पालिका प्रशासन व पुरातत्त्व विभागाने किल्ल्यासह या पिंजऱ्याचे पुनरुज्जीवन करावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

अजिंक्यताऱ्याच्या पूर्व उतारावर असलेल्या मंगळाई मंदिराजवळ जंगली श्वापद पकडण्यासाठी इतिहासकाळात दगडी पिंजरा बांधण्यात आला. त्याच्या काळासंबंधी निश्चित पुरावा नसला तरी त्याच्या स्थापत्यावरून शाहू महाराजांच्या कारकिर्दीत त्याचे बांधकाम झाले असावे, असे दिसते. एखादे भुयार असावे, अशी या पिंजऱ्याची रचना होती.

कधीकाळी त्याच्या तोंडाशी वर-खाली सरकणारे लोखंडी दारदेखील असावे; परंतु कालौघात या पिंजऱ्याची वाताहत झाली. पालिका प्रशासन व पुरातत्त्व विभागाने अजिंक्यतारा किल्ला संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. हे करत असताना दगडी पिंजऱ्याला ऊर्जितावस्था द्यावी, अशी इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे.

राज्यकर्त्यांची दूरदृष्टी..

  • अशा प्रकारचा पिंजरा भारतात इतर कोणत्याही ठिकाणी अजून तरी आढळून आला नसल्याने हा इतिहास काळातील जंगली श्वापदे पकडण्याचा एकमेव पिंजरा ठरावा. त्यामुळे इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा अवशेष ठरतो.
  • किल्ल्याच्या पूर्व बाजूला असलेल्या पाटेश्वर डोंगरापासून ते पश्चिमेकडील यवतेश्वर पठाराच्या पलीकडील भूभाग हा दुर्मीळ होत चाललेल्या प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास क्षेत्र होता. आजही बिबट्यासारखे प्राणी याच भागात आढळून येतात.
  • सातारा शहराची निर्मिती होत असताना या जंगली श्वापदांचा शहरातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून तत्कालीन राज्यकर्त्यांनी हा पिंजरा उभारला असावा.


अशी आहे अवस्था..

अशा प्रकारचा पिंजरा भारतात अजूनतरी कोठे आढळला नाही. या दगडी पिंजऱ्यावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. पिंजऱ्याचे काही दगड मातीखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे हा पिंजरा आता सहज नजरेस पडत नाही. किल्ले अजिंक्यताऱ्याचे संवर्धन करत असताना प्रशासाने या पिंजऱ्यालादेखील पुनरुज्जीवन द्यावे. -नीलेश पंडित, कार्याध्यक्ष, जिज्ञासा संस्था

Web Title: The historic stone cage at Fort Ajinkyatara in Satara awaits conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.