Satara: कासवरील फुलांच्या पर्वणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात, ऑफलाईन तिकिटाद्वारे फुले पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:02 IST2025-10-21T18:01:47+5:302025-10-21T18:02:01+5:30
पठारावर मिकी माऊसची पिवळी फुले काहीशी उपलब्ध

Satara: कासवरील फुलांच्या पर्वणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात, ऑफलाईन तिकिटाद्वारे फुले पाहता येणार
पेट्री : जागतिक वारसास्थळ म्हणून ओळख असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ओसरत चालला आहे. पुष्पपठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. यावर्षीचा कास पुष्प पठारावरील फुलांच्या पर्वणीचा सूर्योदय मावळत चालला असून, १५ ऑक्टोबरपासून ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आले आहे.
पठारावर तिसऱ्या टप्प्यात येणारी मिकी माऊस व सोनकीची पिवळी धम्मक छटा अद्यापही काही ठिकाणी तुरळक पाहायला मिळत आहे. ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आले असले, तरी येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार ऑफलाईन पद्धतीने ५० रुपये पर्यटन शुल्क भरून फुले पाहता येतील, असा निर्णय कास पठार समिती व वन विभागाच्या बैठकीमध्ये झाला.
कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रानफुलांचा हंगाम मावळतीबरोबरच पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघही ओसरल्याचे चित्र आहे. पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारा कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांचा हंगाम ४ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.
सध्या पठारावर दहा ते बारा प्रकारची तुरळक फुले असून, पिवळी मिकी माऊस व कुमुदिनीला मध्यम बहर असून, सद्यस्थितीत गवत वाढल्याने पठारावर २० टक्के फुले असून, वातावरण चांगले राहिल्यास कुमुदिनी फुलांचा दहा दिवस हंगाम टिकून राहील. - ज्ञानेश्वर आखाडे, सदस्य, कास पठार समिती