Satara: मशालींच्या प्रखर ज्योतीने सज्जनगड उजळून निघाला; भक्ती, शौर्य, इतिहासाचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:06 IST2025-10-21T14:06:06+5:302025-10-21T14:06:35+5:30
भक्तीच्या तेजात उजळला सज्जनगड ! राज्यभरातील भाविकांची हजेरी

छाया-जीवन पिलावरे
सातारा : साताऱ्यातील किल्ले सज्जनगडावर या वर्षीची दिवाळीची पहिली पहाट एका अलौकिक उत्साहात आणि अभूतपूर्व मशाल महोत्सवाने साजरी झाली. सोमवारी पहाटे हजारो मशालींच्या प्रखर ज्योतीने अवघा गड उजळून निघाला. हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या हजारो शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भक्ती, शौर्य आणि इतिहासाचा एक अविस्मरणीय संगम येथे अनुभवायला मिळाला.
सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पवित्र भूमीवर शेकडो मशालींच्या तेजाने उजळलेला सज्जनगड पाहताना उपस्थित प्रत्येकाच्या मनात अभिमान, उत्साह दाटून आला होता. माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचे बाळासाहेब स्वामी, श्री समर्थ सेवा मंडळाचे योगेशबुवा पुरोहित (रामदासी) यांच्यासह विविध जिल्ह्यातील भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
नगरप्रदक्षिणेची परंपरा
पहाटे चार वाजताच कार्यक्रमाला सुरुवात झाली. भातखळे (वाहनतळ) येथून फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तींची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. या पालखीला अश्ववंदना देण्यात आली. श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचे कौस्तुभबुवा रामदासी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मशाल महोत्सवाच्या नगरप्रदक्षिणेला सुरुवात झाली.
हलगी, ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि आकर्षक रांगोळीच्या सजावटीतून पालखीचा मार्ग प्रकाशित झाला. पालखीच्या मागे शेकडो मावळ्यांनी हातात मशाली घेऊन ‘जय शिवाजी.. जय भवानी’चा जयघोष करत गायमुख, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार या पारंपरिक मार्गाने अंगलाई मंदिरात प्रवेश केला.
तटबंदीवर फटाक्यांची आतषबाजी!
नगर प्रदक्षिणेनंतर पालखी धाब्याच्या मारुती या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याचवेळी मशालींच्या तेजाने आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण तटबंदी लख्ख उजळून निघाली आणि गडाच्या खालील परळी पंचक्रोशीवर त्या प्रकाशाची तेजस्वी झळाळी उमटली. समाधी मंदिर परिसरात छत्रपतींच्या पालखीचे आगमन होताच संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. यानंतर अशोक वनात साहसी खेळांसह शाहिर रंगराव पाटील यांचा शिवकालीन ऐतिहासिक पोवाड्याचा दमदार कार्यक्रम सादर झाला.