सातारा: गुडघाभर पाण्यातूनच शेतकऱ्याने काढली बाजरीची कणसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:21 IST2022-10-20T17:19:16+5:302022-10-20T17:21:02+5:30
पावसामुळे बाजरीची काढणी व खुडणी करता येत नसल्याने शेतकरी हतबल

सातारा: गुडघाभर पाण्यातूनच शेतकऱ्याने काढली बाजरीची कणसे
तरडगाव : परतीच्या पावसाने राज्यात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात ओढ्या नाल्याला आलेल्या पुरात एकच जण वाहून गेल्याचीही घटना घडली. यासर्व परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे.
फलटण तालुक्यातील तरडगाव परिसरात सोयाबीन व बाजरी पिकाचे नुकसान झाले असून बाजरी पिकाची काढणी करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच शिंदेमाळ परिसरातील एका शेतकऱ्याने तर पाऊस थांबत नसल्याने चक्क गुडघाभर पाण्यातच बाजरीची कणसे काढण्यास सुरुवात केल्याचे पहावयास मिळाले.
परिसरात बऱ्याच ठिकाणी बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू केले गेले नसल्याने शेतकऱ्यामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पावसामुळे बाजरीची काढणी व खुडणी करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी होवू नये यासाठी अशा बिकट अवस्थेत देखील शेतातून बाजरीची कणसे सुरक्षित ठिकाणी कशी पोहचविता येतील यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू होती.