Satara: ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला, दुचाकींना धडक देत ट्रक रुग्णालयाच्या आवारात घुसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:30 IST2025-03-24T13:29:55+5:302025-03-24T13:30:34+5:30
अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रक तेथेच सोडून पोबारा केला

Satara: ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला, दुचाकींना धडक देत ट्रक रुग्णालयाच्या आवारात घुसला
कऱ्हाड : ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रक दोन दुचाकींना धडक देत रुग्णालयाची भिंत पाडून आतमध्ये घुसला. शहरातील भेदा चौकात शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
हनुमंत भारत ढोले (वय ३५, रा. कायापूर, जि. धारासिंग), असे ट्रकचालकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तासगावहून एक ट्रक विट्याला जाण्यासाठी कार्वेनाका मार्गे येत होता. शहरानजीच्या कार्वेनाका येथे रात्री उशिरा ट्रक आला असता ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याच परिस्थितीत त्याने ट्रक पुढे घेतला.
मात्र, भेदा चौकात असलेल्या वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे चौकात रस्त्यानजीक पार्क केलेल्या दोन दुचाकींना धडक देत ट्रकने रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीला धडक दिली. त्यामध्ये संपूर्ण भिंत कोसळली. अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रक तेथेच सोडून पोबारा केला.
अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून चालकाचा शोध सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक मारुती चव्हाण यांच्यासह पथकाने रविवारी दुपारी ट्रकचालक हनुमंत ढोले याला ताब्यात घेतले आहे. जखमी असल्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.