कारमध्ये चाळीस लिटर डिझेल भरलं अन् पैसे न देताच झाले पसार; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 18:53 IST2022-03-09T18:35:58+5:302022-03-09T18:53:10+5:30
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

कारमध्ये चाळीस लिटर डिझेल भरलं अन् पैसे न देताच झाले पसार; साताऱ्यातील घटना
सातारा : कारमध्ये चाळीस लिटर डिझेल भरल्यानंतर, पैसे न देताच कर्मचाऱ्यांच्या हाताला हिसका मारून तिघांनी पलायन केले. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील संगमनगरमधील पेट्रोलपंपावर घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात नीलेश महादेव शेलार (रा. सैदापूर, ता. सातारा) याच्यासह त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.
अमोल पारेख (वय ३४, रा. गणेश काॅलनी, संगमनगर, सातारा) यांचा संगमनगर खेड येथे पेट्रोल पंप आहे. दि. १ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पेट्रोल पंपावर असेंट कार (एमएच १२ डीएस-१२७०) पेट्रोल भरण्यासाठी आली. कारमधील व्यक्तीने चाळीस लिटर डिझेल भरण्यास सांगितले. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने ३ हजार ७४९ रुपयांचे डिझेल भरले. पैसे मागितले असता त्यातील एकाने हाताला हिसका मारून कारसह पलायन केले.
या प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या फुटेजवरून कारचा नंबर आणि नाव शोधून काढलं. सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक चाैधरी हे अधिक तपास करीत आहेत.