पर्यटन, वारसा स्थळ, आरोग्यक्षेत्राला ‘बूस्टर’ !; अर्थसंकल्पात साताऱ्याला झुकते माप, मुनावळे-वासोटा ‘रोपवे’ची भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:26 IST2026-03-07T15:25:28+5:302026-03-07T15:26:52+5:30
पर्यटनवाढीला चालना तर रोजगाराच्याही संधी

संग्रहित छाया
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विकसित महाराष्ट्राचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील शेतकरी, पर्यटन, वारसास्थळांचे जतन, आरोग्य या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. या शिवाय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र तसेच महात्मा फुले यांचे जन्मगाव असलेल्या कटगुण (ता. खटाव) येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
मुनावळे-वासोटा ‘रोपवे’ची भरारी
सातारा : सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात आणि कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक किल्ले वासोटा आता पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित होणार आहे. शुक्रवारी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनावळे ते वासोटा रोपवे या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील पर्यटनाला आता जागतिक स्तरावरील मोठी ओळख प्राप्त होणार असून, स्थानिकांसाठी रोजगाराची कवाडे उघडली जाणार आहेत.
किल्ले वासोटा हा दुर्गप्रेमी आणि निसर्गवेड्या पर्यटकांच्या कायमच पसंतीस उतरतो. दरवर्षी हजारो पर्यटक येथील जलसफारी आणि थरारक जंगल सफारीचा अनुभव घेण्यासाठी वासोट्याला भेट देत असतात. मात्र, हा किल्ला सर करणे तसे सोपे काम नाही. बामणोली किंवा मुनावळे येथून बोटीने प्रवास केल्यानंतर साधारण दोन ते अडीच तास घनदाट झाडीतून, दगडधोंड्यांच्या आणि निसरड्या पायवाटांवरून पायपीट करावी लागते. हा प्रवास करताना पाय घसरून अपघात होण्याची भीती असते. पर्यटकांच्या याच समस्यांना पूर्णविराम देण्यासाठी शासनाने आता ‘रोपवे’चा मास्टरप्लॅन आखला आहे.
या प्रकल्पामुळे पर्यटकांना काही मिनिटांतच किल्ले वासोटा गाठता येईल. उंचावरून सह्याद्रीचा थरार, घनदाट जंगल आणि कोयना जलाशयाचा विहंगम नजारा अनुभवणे हा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. या आधुनिक रोपवेमुळे वृद्ध आणि लहान मुलांनाही आता सहजपणे हा ऐतिहासिक किल्ला पाहता येईल.
दरे येथे निसर्गोपचार केंद्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या मूळगावी अद्यावत निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या केंद्रामुळे कोयना परिसरातील निसर्ग पर्यटनाला आता आरोग्याची जोड मिळणार असून, स्थानिकांना शाश्वत रोजगार मिळण्यास मदत होईल. मुनावळे ते वासोटा रोपवे आणि दरे येथील निसर्गोपचार केंद्र या दोन्ही प्रकल्पांमुळे संपूर्ण कोयना-कांदाटी खोऱ्याचा कायापालट होणार आहे. पर्यटनवाढीसोबतच या दुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासाला यामुळे मोठी गती मिळेल.