मुलाने सेल्फी पाठवली अन् मोठी फसवणूक टळली; साताऱ्यातील घटना

By प्रगती पाटील | Published: February 17, 2024 02:19 PM2024-02-17T14:19:19+5:302024-02-17T14:19:38+5:30

सातारा : ‘तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा कुठे आहे? मी सीबीआयमधून बोलतोय. आम्ही त्याला अटक केली आहे,’ असे ...

The boy sent a selfie and Dr. Pratibha Mote from Satara cleverly avoids his deception | मुलाने सेल्फी पाठवली अन् मोठी फसवणूक टळली; साताऱ्यातील घटना

मुलाने सेल्फी पाठवली अन् मोठी फसवणूक टळली; साताऱ्यातील घटना

सातारा : ‘तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा कुठे आहे? मी सीबीआयमधून बोलतोय. आम्ही त्याला अटक केली आहे,’ असे म्हणत साताऱ्यातील डाॅ. प्रतिभा मोटे यांना फोन आला. एकुलत्या एक लेकाने असे काय केले असेल, असा विचार डोक्यात येण्यापूर्वीच त्यांनी चाणाक्षपणे मुलाशी संपर्क साधून त्याला सेल्फी पाठविण्यास सांगितले. मुलगा आणि मुलगी दोघेही सुखरूप असल्याचे समजल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल केली. डाॅ. मोटे यांनी रेकाॅर्ड केलेली ही ऑडिओ क्लिप सध्या राज्यभर व्हायरल झाली आहे.

सातारा येथील विलासपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या डाॅ. प्रतिभा मोटे यांचा मुलगा नोकरीच्या निमित्ताने तर मुलगी शिक्षणासाठी परगावी असतात. सकाळी आवरून क्लिनिकला जायच्या गडबडीत असतानाच डाॅ. मोटे यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. रुग्णाचा काॅल असेल असे वाटल्याने त्यांनी तो स्वीकारला. मी सीबीआयमधून राहुल खन्ना बोलतोय, असे म्हणत फोनवरील व्यक्तीने, “आम्ही तुमच्या मुलाला अटक केली आहे. तो खूप रडतोय...” असे ऐकवायला सुरुवात केली.

मुलगा परगावी असला तरीही तो चुकीचे काहीच करणार नाही याची खात्री असल्याने त्यांनी हा फोन कट केला. डाॅ. मोटे यांची नणंद डाॅ. अरुंधती कदम यांनी तातडीने अथर्व मोटे याला फोन करून चाैकशी केली. आपण ऑफिसमध्ये असून, काम सुरू आहे, असे त्याने सांगितल्यावर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. त्यातच सेल्फी मागवून कुटुंबाने पक्की खात्री केली आणि मग ही ऑडिओ क्लिप इतरांना सावध करण्याच्या उद्देशाने व्हायरल केली.

ही सावधानता बाळगली

अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर समोरून येणारी माहिती काय येईल याची शाश्वती नसते. त्यामुळे असे फोन आल्यानंतर मिळालेल्या माहितीची खातरजमा न करता संवाद वाढवू नये. कुटुंबातील सदस्यांशी निगडित एखादी घटना घडली असेल तर तातडीने त्यांच्याशी संपर्क साधून ख्यालीखुशाली विचारणे उत्तम ठरते. डाॅ. मोटे यांनी ही सावधानता बाळगल्याने पुढील अनर्थ टळला.

तळेगाव दाभाडे हद्दीत फसवणूक

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीत अशाच प्रकारे फसवणूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी समाजमाध्यमाद्वारे 92585271533, 923246176297, 892082735443, 892829134168, 8968169125 या मोबाइल क्रमांकांवरून आलेले फोन न उचलण्याचे आवाहन केले आहे.

मुलं परगावी असतील तर त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली की पालकांना घाबरायला होतेच. पण, गोंधळून न जाता संयमाने मार्ग काढायचा ठरवलं तर फसवणूक होत नाही. मुलांच्या विषयी पालक भावनिक असतात हे हेरून त्या पद्धतीने फसवणुकीचे सुरू असलेले प्रकार पालकांनी सजगपणे हाणून पाडले पाहिजेत. - डाॅ. प्रतिभा मोटे, सातारा

Web Title: The boy sent a selfie and Dr. Pratibha Mote from Satara cleverly avoids his deception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.