Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:53 IST2025-12-22T17:49:53+5:302025-12-22T17:53:31+5:30
महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळवता आला नाही

Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्री
सातारा : सातारा नगरपालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध करत स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपचे अमोल मोहिते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांचा दारुण पराभव करत नगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला. पालिकेत भाजपचे सर्वाधिक ४० उमेदवार निवडून आले असून, ९ अपक्ष उमेदवारांनीही विजयाचा गुलाल उधळला. शिंदेसेनेने एका जागेवर विजय मिळवत पालिकेत प्रवेश केला.
सातारा नगरपालिकेच्या २५ प्रभागांतील ५० नगरसेवकपदांसाठी यंदा मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सर्व ५० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर भाजपाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी, शिंदेसेना व अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत कंबर कसली हाेती.
वाचा: कराडमध्ये भाजपसह काँग्रेसला मोठा धक्का; यशवंत, लोकशाही आघाडीची बाजी!
भाजपने यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने महाविकास आघाडी यंदा बाजी पलटवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, ‘महाविकास’चा फॉर्म्युला साताऱ्यात सपशेल फेल ठरला.
वाचा: फलटणमध्ये रामराजेंच्या तीस वर्षांच्या सत्तेला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लावला सुरुंग
महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. उलट भाजपने तिकिटात डावललेल्या बंडखोर उमेदवारांनीच भाजपा उमेदवारांचा दारुण पराभव करत आपल्या प्रभागात आपणच ‘धुरंधर’ असल्याचे दाखवून दिले.
वाचा: मंत्री मकरंद पाटीलांच्या गडाला तडा, वाई नगरपालिकेत भाजपची मुसंडी
या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते विजयी झाले. त्यांच्या पारड्यात ५७ हजार ५८७ मते पडली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांना १५ हजार ५५५ मतांवर समाधान मानावे लागते. ५० पैकी ४० जागा भाजपाच्या पारड्यात गेल्या. नऊ ठिकाणी अपक्ष तर एका ठिकाणी शिंदेसेनेच्या उमेदवाराने विजयाचा गुलाल उळधला. पालिकेत भाजपने मुसंडी घेतली असली तरी अपक्षांचे ‘राजकीय वजन’ मात्र यंदा चांगलेच वाढले. त्यांच्यामुळे भाजपच्या प्रमुख व ज्येष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
वाचा: सातारा जिल्ह्यात भाजपचा वारू कराड, पाचगणी, महाबळेश्वरला रोखला
प्रभाग तीनमध्ये भाजपचा बालेकिल्ला ढासळला
प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपने दोन्ही जागा गमावल्या आहेत. येथे रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील मोझर यांच्या अपक्ष उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.
अशोक मोने यांच्या ३५ वर्षांच्या सत्तेला ‘ब्रेक’
सर्वात मोठा उलटफेर प्रभाग क्रमांक २१ मध्ये पाहायला मिळाला. येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे खंदे समर्थक आणि सलग ३५ वर्षे नगरसेवक राहिलेले अशोक मोने यांचा पराभव झाला. अपक्ष उमेदवार सागर पावसे यांनी मोने यांच्या राजकीय प्रवासाला लगाम लावत विजयश्री खेचून आणली.
प्रतिष्ठेच्या लढाईत प्रशांत आहेरराव विजयी
प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपने नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्या जागी संतोष पवार यांना मैदानात उतरवले होते. मात्र, भाजपने डावललेले प्रशांत आहेरराव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. या विजयामुळे पालिकेत आहेरराव यांनी दमदार प्रवेश केला आहे.
या अपक्षांनी मारली बाजी
प्रभाग आणि उमेदवार
१ : शंकर कीर्दत
३ : गुरुदेव ऊर्फ मयूर कांबळे, जयश्री जाधव
६ : रविराज कीर्दत
१३ : सावित्री बडेकर
१४ : दिनाज पवार
१८ : विनोद फरांदे
२० : प्रशांत आहेरराव
२१ : सागर पावसे