Satara: ‘काशीनाथाचं चांगभलं' चा गजर; लाखो भाविकांच्या साक्षीने रंगला बावधनचा बगाड सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:29 IST2026-03-09T18:28:44+5:302026-03-09T18:29:02+5:30
मागील पाच दिवसांपासून ते गावातील सर्व मंदिरांत पूजा करून मंदिरातच मुक्कामाला असतात

Satara: ‘काशीनाथाचं चांगभलं' चा गजर; लाखो भाविकांच्या साक्षीने रंगला बावधनचा बगाड सोहळा
बावधन : 'काशीनाथाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी साडेअकराच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. बावधनकरांच्या याच श्रद्धेमुळे गेल्या चार-पाच वर्षांत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर परराज्यांतून हजारो भाविक यात्रेस भेट द्यायला येताहेत.
बगाड मिरवणूक पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने यात्रेकरू जमा झाले होते. सर्व शिवार आणि रस्ते बगाड ओढणारे बैल आणि यात्रेकरू ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले होते. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन येथील भैरवनाथ मंदिरात यावर्षीचा बगाड्या निवडण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. यावर्षीचा बगाडाचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे.
मागील पाच दिवसांपासून ते गावातील सर्व मंदिरांत पूजा करून मंदिरातच मुक्कामाला असतात. शनिवारी रात्री बावधन येथे ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत मोठी शाही छबिना मिरवणूक निघाली होती. या छबिण्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेकरू सहभागी झाले होते.
सकाळी बगाड्याला आणि बगाडाचा रथ कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वर येथे आणण्यात आला. तिथे ग्रामदेवतेच्या पूजा झाल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास बगाड्याला बगाडाला टांगण्यात आले.
धुष्टपुष्ट बैलांच्या मदतीने दगडी चाकांचे तीन-चार टन वजनाचा बगाडाचा रथ बैलांच्या मदतीने ओढून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवारनिहाय व तरफनिहाय ठिकठिकाणी सहा ते बारा बैल जुंपून बगाडाचा रथ शेत शिवारातून ओढून बावधन गावात भैरवनाथ मंदिराकडे आणला गेला.
बगाड रथ नियोजनात सुसूत्रता...
बगाड रथाच्या मागे अन् पुढे भैरव देव देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळ बावधन यांच्या वतीने ध्वनिक्षेपाच्या साहाय्याने बगाडाला बैल जुंपणे, बैल बदलणे, तसेच आवश्यक सूचना तसेच आवश्यक नियोजन केले जात असल्याने बगाड रथ नियोजनात सुसूत्रता येत होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे तसेच पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.
वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल
सातारा जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल करण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील तत्पर सेवा देण्यासाठी सज्ज होते. वाई सातारा रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ, खेळण्यांची दुकाने लागली आहेत. काशीनाथाच्या चांगभलंच्या गजरात रात्री ८ वाजता बगाड श्री काळभैरवनाथ मंदिरात पोहोचले. किरकोळ दुखापत वगळता यात्रा सुरळीत पार पडली.