99th Marathi Sahitya Sammelan: संमेलनात प्रथमच १० माजी अध्यक्ष, रसिकांत अमाप उत्साह
By नितीन काळेल | Updated: January 1, 2026 17:03 IST2026-01-01T17:03:31+5:302026-01-01T17:03:58+5:30
सारस्वतांची मांदियाळी

99th Marathi Sahitya Sammelan: संमेलनात प्रथमच १० माजी अध्यक्ष, रसिकांत अमाप उत्साह
नितीन काळेल
सातारा : ऐतिहासिक सातारा शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य असे की, मागील अध्यक्षा डाॅ. तारा भवाळकर यांच्यासह १० माजी अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. हे सर्वजण चार दिवस संमेलनात सहभागी होणार आहेत. यामुळे सातारकर तसेच साहित्य रसिकांना त्यांना भेटण्याची संधीही प्राप्त होणार आहे.
सातारा शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाला यश आल्याने सातारकरांना २०२६ मधील ९९ वे संमेलन भरविण्याचा मान मिळाला. या संमेलनाचे अध्यक्ष ‘पानिपत’कार विश्वास पाटील आहेत; तसेच हे संमेलन गुरुवार, दि. १ जानेवारीपासून सुरू होत आहे. रविवारपर्यंत चार दिवस विविध कार्यक्रमांनी संमेलन पार पडेल.
सातारा शहरात महाराष्ट्राबरोबरच देशातून साहित्यिक, प्रकाशक तसेच साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत; पण या संमेलनात विविध वैशिष्ट्ये आणि पैलूही पाहावयास मिळणार आहेत. या संमेलनाचे खास वैशिष्ट म्हणजे दिल्लीत झालेल्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डाॅ. तारा भवाळकर या साताऱ्यात पाच दिवस असणार आहेत. याशिवाय संमेलनाचे इतर नऊ माजी अध्यक्षही संमेलनात चार दिवस सहभागी होणार आहेत. हे सर्वजण संमेलनाच्या व्यासपीठावर दिसतील. यापूर्वी झालेल्या संमेलनांत असे कधीही दिसून आले नव्हते. त्यामुळे साताऱ्याचे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
हे माजी अध्यक्ष संमेलनात असणार...
- डाॅ. तारा भवाळकर (२०२५, दिल्ली)
- डाॅ. रवींद्र शोभणे (२०२४, अमळनेर)
- भारत सासणे (२०२२, उदगीर)
- डाॅ. अरुणा ढेरे (२०१९, यवतमाळ)
- लक्ष्मीकांत देशमुख (२०१८, बडोदा, गुजरात)
- अक्षयकुमार काळे (२०१७, डोंबिवली)
- श्रीपाल सबनीस (२०१६ पिंपरी चिंचवड)
- सदानंद मोरे (२०१५, घुमान पंजाब)
- फ. मुं. शिंदे (२०१४, सासवड)
- उत्तम कांबळे (२०१०, ठाणे)
ऐतिहासिक सातारा शहरातील ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ‘न भूतो, न भविष्यती’ असेच होणार आहे. चार दिवस हा सोहळा रंगणार आहे. त्यामुळे सातारकरांबरोबच साहित्य रसिकांनी या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे. संमेलनाला मोफत प्रवेश आहे. त्यामुळे संमेलनाची संधी चुकवू नये. - विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन