बिबट्याची दहशत; मालकावर आली रक्षणकर्त्या कुत्र्याचे रक्षण करण्याची वेळ; शेतकऱ्याने लढवली शक्कल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:21 IST2022-02-04T14:05:26+5:302022-02-04T14:21:39+5:30
बिबट्याच्या हल्ल्यापासून कुत्र्यांचच रक्षण करण्याची मालकांवर आली वेळ

बिबट्याची दहशत; मालकावर आली रक्षणकर्त्या कुत्र्याचे रक्षण करण्याची वेळ; शेतकऱ्याने लढवली शक्कल..
पेट्री : कुत्रा म्हटले की घरदार, शेतीभाती, पाळीव प्राणी यांचा रक्षण कर्ता अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. जीवावर उदार होऊन तो रक्षणकर्त्याची भूमिका बजावत असतो. पण हल्ली बिबट्यांचा हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने बिबट्यांपासून कुत्र्यांचच रक्षण करण्याची वेळ मालकांवर आली आहे. त्यासाठी कास परिसरातील एका शेतकऱ्याने कुत्र्याच्या गळ्यात चक्क खिळ्यांचा पट्टा बांधला आहे.
कास पठार परिसर हा जंगल डोंगरदऱ्यांनी व्यापला आहे. कास पठार परिसरात अनेक छोट्या मोठ्या वस्त्या आहेत. पशुपालन व शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. दिवसभर जनावरे जंगलात चरण्यासाठी जात असतात. त्यांच्यासोबत गुराखी असतात. पण हल्ली वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता पाळीव प्राण्यांवर बिबट्या, तरस, लांडगे या प्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे शेतकरी प्राण्यांच्या संरक्षणासाठी एक कुत्रा नेहमी सोबत ठेवतात.
वन्यप्राण्यांना जंगलात पुरेसे खाद्य उपलब्ध नसल्याने हे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या प्राण्यांना घाबरवण्यासाठीही कुत्र्याची मदत होते. या पार्श्वभूमीवर कुत्रा हा घटक शेतकऱ्यांसाठी मोलाची भूमिका निभावत असतो पण अलीकडच्या काळात याच कुत्र्यांवर बिबट्यांच्या हल्ल्यामुळे संक्रांत आली आहे.
बिबट्या मानेला पकडून प्राण्यांना ठार करत असतो. हीच बाब लक्षात घेऊन कुसुंबीमुरा येथील शेतकरी पांडूरंग कोकरे यांनी कुत्र्याच्या मानेभोवती अनुकूचीदार खिळे असलेला पट्टा बसवलेला आहे. कधी कुत्र्यावर हल्ला झालाच तर मानेचे संरक्षण हा टोकदार खिळ्यांचा पट्टा करणार आहे.
त्यामुळे कुत्र्याच्या मानेसारख्या संवेदनशील अवयवाचे संरक्षण झाल्याने प्राणघातक हल्ल्यापासून वाचणार आहे. ही युक्ती शेतकऱ्यांनी मोठ्या खुबीने केली आहे. चामड्याच्या जाड पट्ट्याला उलटे खिळे ठोकले आहेत. या खिळ्यांचा त्रास कुत्र्याला होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
कुत्र्याचे लहान पिल्लू ते मोठे कुत्रे होण्यापर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते. हा कुत्रा घरातील एका सदस्याप्रमाणे असतो, आणि अचानक त्याच्यावर हल्ला होऊन आपल्यातून जान्याने मनाला वेदना होतात. या जीवाभावाच्या संवगड्याचे रक्षण करण्यासाठी ही युक्ती केली आहे. - पांडूरंग कोकरे, शेतकरी, कुसुंबीमुरा.