Satara: गव्याच्या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी, ओझर्डे परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:48 IST2026-03-06T15:47:15+5:302026-03-06T15:48:37+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारपूस

Satara: गव्याच्या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी, ओझर्डे परिसरात भीतीचे वातावरण
कोयनानगर : पाटण तालुक्यातील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा परिसरात गव्याने अचानक केलेल्या हल्ल्यात नवजा येथील ग्राम महसूल अधिकारी तलाठी अजय जाधव (वय ३०) हे जखमी झाले. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय जाधव हे कराटे सजातील कामकाज उरकून बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून नवजा येथे घरी जात होते. ओझर्डे धबधबा परिसरात पोहोचताच अचानक एक गवा त्यांच्या गाडीसमोर आडवा आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ मोटारसायकल थांबवली. याच दरम्यान झुडपातून दुसरा गवा अचानक बाहेर येत त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ते मोटारसायकलवरून खाली पडले.
घटनेनंतर त्यांनी मोबाइलवरून स्थानिक नागरिक व नातेवाइकांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेत त्यांनी जाधव यांना प्रथमता मानाईनगर उपकेंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक तपासणी व उपचारासाठी त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी रंगनाथ असवले, संजय जंगम व इतर महसूल कर्मचारी तसेच वन्यजीव विभागाचे वनपाल बाबूराव कदम, लिपिक संतोष चाळके, वनरक्षक विश्वजीत पाटील, सुनील शिसाळ व विनायक कणसे हे जखमी जाधव यांचे सोबत रात्री उशिरापर्यंत होते. जखमी जाधव यांना वन्यजीव विभागाच्या वाहनातून उपचारासाठी कराडमध्ये नेण्यात आले. उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याने गुरुवारी पहाटे त्यांना घरी आणण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारपूस
घटनेची माहिती मिळताच पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप तसेच वनक्षेत्रपाल अक्षय साळुंखे यांनीही जखमी जाधव यांच्या प्रकृतीची विचारपूस करत रात्रभर संपर्कात होते. कोयना भागात रानगवा व इतर वन्यप्राण्यांची वाढती वर्दळ व हल्ले चिंतेचा विषय ठरत असून वनविभागाने तातडीने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.