तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे, साताऱ्यात काँग्रेसचे पोवई नाक्यावर आंदोलन
By नितीन काळेल | Updated: January 19, 2024 15:13 IST2024-01-19T15:13:08+5:302024-01-19T15:13:34+5:30
सातारा : तलाठी भरतीची चाैकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी तसेच तसेच येथून पुढील भरती ही राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात ...

तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे, साताऱ्यात काँग्रेसचे पोवई नाक्यावर आंदोलन
सातारा : तलाठी भरतीची चाैकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी तसेच तसेच येथून पुढील भरती ही राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात यावी अशी घोषणाबाजी करत युवक काॅंग्रेसच्या वतीने पोवई नाक्यावर आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी राज्य शासनाचा निषेधही करण्यात आला.
युवक काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एहसान खान, प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे, तारीक बागवान, जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, जिल्हा प्रभारी अमोल दाैडकर, उपाध्यक्ष अमित जाधव, प्रदेश सचिव प्राची ताकतोडे, अमोल शिंदे, नरेंद्र पाटणकर, भूषण देशमुख, देवदास माने, शहानूर देसाई, अरबाज शेख आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
युवक राष्ट्राचा कणा असतो हे सत्य नाही तर केवळ घोषणेचे वाक्य आहे असा समज करुन घेऊन राज्यातील सरकार काम करत आहे, असे खेदाने म्हणावे लागत आहे. कारण, युवकांच्या भविष्याशी खेळून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्राचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातच आता नेहमीप्रमाणे तलाठी भरतीची परीक्षा खासगी कंपनीकडून पार पडली.
यावेळीही पेपरफुटी आणि परीक्षेत गैरव्यवहाराच्या प्रकाराला सामोरे जावे लागले. या परीक्षेत २०० पैकी २१४ गुण मिळाल्याचे पुरावे मिळूनही भाजप प्रणित राज्य शासन परीक्षेत सावळा गोंधळ झाल्याचे मान्य करत नाही. याचा आम्ही निषेध करतो, असे युवक काॅंग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.