Satara: कऱ्हाडात जीवघेणा उद्योग; वाहनात भरला जातोय घरगुती गॅस सिलिंडर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:59 IST2025-08-08T15:58:35+5:302025-08-08T15:59:00+5:30

दोन ठिकाणी मिळून २८ सिलिंडरसह मशीन जप्त : बनवडी फाट्यावर बेकायदा गॅस भरणाऱ्यांवर पुरवठा शाखेची कारवाई

Supply branch takes action against those illegally filling gas in rickshaws and other vehicles in Karad | Satara: कऱ्हाडात जीवघेणा उद्योग; वाहनात भरला जातोय घरगुती गॅस सिलिंडर 

Satara: कऱ्हाडात जीवघेणा उद्योग; वाहनात भरला जातोय घरगुती गॅस सिलिंडर 

कऱ्हाड : कऱ्हाड शहर व तालुक्यात बेकायदेशीरपणे रिक्षा, तसेच इतर वाहनांमध्ये गॅस भरण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. यावर गुरुवारी पुरवठा शाखेच्या वतीने कारवाईची मोहीम राबवण्यात आली. सकाळी सुमारे दहा वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील भागात एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणाहून ३ सिलिंडर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणी बाबासाहेब मुल्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांनी बनवडी फाटा येथे बेकायदा गॅस भरणाऱ्या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत २५ सिलिंडर आणि रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी २ मशीन जप्त करण्यात आली आहेत.

शहराजवळील बनवडी फाटा येथील एका हॉटेलच्या मागील बाजूस बंद खोलीत बेकायदेशीरपणे रिक्षा वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडी आणि पुरवठा निरीक्षक सागर ठोंबरे यांना मिळाली.  त्यांनी जागामालक युवराज माळी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, जागामालकांनी बंद खोलीचे कुलूपची चावी नसल्याचे सांगितले.

नंतर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत मिळून बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये २५ गॅस सिलिंडर आणि दोन मशीन जप्त करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई करताना बनवडी पोलिस पाटील रोहित पाटील, तलाठी वैभव शितोळे, कर्मचारी महादेव पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

एवढ्या गॅस टाक्या कोठून येतात? 

कऱ्हाड शहरात गॅस टाक्यांचा पुरवठा करणाऱ्या एका गॅस एजन्सीकडून तब्बल २५ सिलिंडर बनवडी फाटा येथे आढळले. यात १९ सिलिंडर भरलेले, तर ५ सिलिंडर रिकामे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने सिलिंडर एजन्सीकडून कशा प्रकारे एकाच ठिकाणी वितरित करण्यात आले. याबाबत शंका निर्माण होत आहे.

दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षा 

घरगुती गॅस सिलिंडरचा रिक्षामध्ये वापर करणे किंवा त्यातून गॅस भरणे, हे बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर कृत्यासाठी कायद्यात कारवाईची तरतूद आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, गॅस पुरवठादेखील खंडित केला जाऊ शकतो. याशिवाय तुमच्यावर गुन्हेगारी खटलादेखील दाखल होऊ शकतो.

Web Title: Supply branch takes action against those illegally filling gas in rickshaws and other vehicles in Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.