Satara: उसाच्या शेतात विद्युत तार पडल्याने ऊसतोड मजूर ठार, तीन एकरातील ऊस जळाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:08 IST2025-01-31T16:08:32+5:302025-01-31T16:08:57+5:30

पाच बैलजोड्यांसह २५ जण बचावले

Sugarcane harvester killed after electric wire falls on sugarcane field in Vidani Satara, three acres of sugarcane burnt | Satara: उसाच्या शेतात विद्युत तार पडल्याने ऊसतोड मजूर ठार, तीन एकरातील ऊस जळाला 

संग्रहित छाया

कोळकी : विडणी येथील २६ फाटा दहाबिघे येथे उसाच्या शेतात २२ किलो वॅट मुख्य विद्युत तार तुटून पडल्याने ऊसतोड मजूर जागीच ठार झाला. शाॅर्टसर्किटने उसाच्या शेताने पेट घेतल्याने तीन एकरातील ऊस जळाला. उसाच्या फडातील ऊसतोड कामगार वाहने वेळीच शेतातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सुभाष ऊखा गायकवाड (वय ४५) असे मृत्यू झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.२९) घडली.

दहाबिघे २६ फाटा येथे फलटण येथील खंडू शेंडे यांच्या शेतात खासगी कारखान्याकडून ऊसतोड सुरू आहे. मजूर सुभाष ऊखा गायकवाड (वय ४५, रा. आंबा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या अंगावर २२ केव्हीची मेन लाईनची तार अचानक तुटून अंगावर पडली. यामध्येच ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाला.

शॉर्टसर्किटने उसाच्या पाचटीमुळे पेट घेतल्यावर काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण करुन तीन एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मुख्य विद्युत वाहिनी तुटून उसाच्या क्षेत्राने पेट घेऊन ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला.

घटनास्थळी महावितरणचे अधिकारी, फलटण ग्रामीणचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असून, महावितरणकडून तातडीची वीस हजार मदत करण्यात आली आहे. बाकीची नुकसान भरपाई लवकरच दिली जाईल, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांनी सांगितले. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात बाबुलाल पवार यांनी फिर्याद दिली आहे.

अनर्थ टळला

या उसाच्या शेतात ऊसतोड करणारे महिला, पुरुष, लहान मुले असे जवळपास वीस ते पंचवीस मजूर होते. तसेच पाच बैलजोड्या होत्या. बैलगाडी, उसाचे ट्राॅलीट्रॅक्टर उभे होते. २२ केव्हीची मेन लाईन उसाच्या शेतात पडल्याने शाॅर्टसर्किटने उसाच्या शेतात पाचटीने पेट घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून ऊसतोड मालक नितीन नारायण पवार यांनी सर्व ऊसतोड मजूर, बैलगाडी, बैल, ट्रॅक्टर बाहेर सुरक्षित स्थळी काढल्याने मोठी जीवितहानी वाचली.

Web Title: Sugarcane harvester killed after electric wire falls on sugarcane field in Vidani Satara, three acres of sugarcane burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.