Satara: गृहपाठ करता करता 'त्या' चिमुकल्यांनी लिहिलं पुस्तक, थेट मंत्र्यांच्या हस्ते झालं प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 07:23 PM2024-03-23T19:23:09+5:302024-03-23T19:25:27+5:30

निलेश साळुंखे कोयनानगर : गृहपाठ करता-करता चिमुकल्या हातांनी पेन हाती घेतला. त्या पेनने केवळ गृहपाठच नव्हे तर वेगवेगळ्या गोष्टी ...

Students of Mulgaon Primary School in Patan Taluka wrote the book, Released by Minister Shambhuraj Desai | Satara: गृहपाठ करता करता 'त्या' चिमुकल्यांनी लिहिलं पुस्तक, थेट मंत्र्यांच्या हस्ते झालं प्रकाशन

Satara: गृहपाठ करता करता 'त्या' चिमुकल्यांनी लिहिलं पुस्तक, थेट मंत्र्यांच्या हस्ते झालं प्रकाशन

निलेश साळुंखे

कोयनानगर : गृहपाठ करता-करता चिमुकल्या हातांनी पेन हाती घेतला. त्या पेनने केवळ गृहपाठच नव्हे तर वेगवेगळ्या गोष्टी कागदावर उतरवल्या. या गोष्टींचे पुस्तक तयार झाले आणि या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही थेट मंत्र्यांच्या हस्ते पार पडला. पाटण तालुक्यातील मुळगावच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलींनी ही किमया केली. एक-दोन नव्हे तर तब्बल २८ गोष्टींचे ५२ पानी पुस्तक या विद्यार्थीनींनी लिहीले आहे.

श्रेया पाटणकर, प्रिती सुपुगडे, जान्हवी साळुंखे, मेघा देसाई, साक्षी देसाई, देवश्री कळके, अनुष्का भिसे, सानिका सुपुगडे, प्रज्ञा गायकवाड, प्रणाली भिसे असे या  बाल लेखिकांची नावे आहेत. सुरुवातीला या बाल लेखिकांनी चित्राचे वर्णन करण्यास सुरूवात केली. त्यामधे शुध्दलेखन व मांडणी यावर भर देत चित्रावरून कल्पना करत त्याची वास्तवाशी जोड लिखाणात देण्याचा प्रयत्न केला. अन् चला पुस्तक लिहु या संकल्पनेला पुस्तकारूपी मुर्त स्वरूप दिलं. चिमुकल्यांनी केलेल्या या किमयाची सर्वत्र वाहवाह होत आहे.

गतवर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे माजी सहाय्यक शिक्षण संचालक नामदेव माळी व जेष्ठ इतिहास अभ्यासक सदानंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोजक्या शिक्षकांची ‘चला लिहूया’ याविषयाची कार्यशाळा झाली होती. त्यामधे सुंदर हस्ताक्षर, शुध्दलेखन यासह चित्रावरून व प्रसंगावरून विद्यार्थ्यांना स्वत:च्या कल्पनेतून गोष्टी लिहिता याव्यात, याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी दिपा बोरकर यांच्या प्रेरणेतून तालुक्यातील निवडक शाळेतील शिक्षकांनी हा उपक्रम हाती घेतला. त्यामधील मुळगाव ही एक शाळा. या शाळेतील चिमुकल्यांना साहित्य क्षेत्राचा लवलेश नसतानाही शाळेतील दहा विद्यार्थीनींनी गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर बाल साहित्यिक म्हणून लेखनाचा ‘श्री गणेशा’ केला.  

शिक्षिका योगिता बनसोडे यांनीही तब्बल बारा महिने त्यांच्याकडून जुन्या-नव्या पाठ्यपुस्तकातील चित्रावरून गोष्टी लिहून घेतल्या. दिवसेंदिवस लिखाणातील चुका कमी करीत नवनवीन कल्पनांना वाव दिला. परिच्छेद तयार करणे, विरामचिन्हांचा योग्य वापर करणे आदी बारकावे तपासल्याने शुध्दलेखनासह दर्जेदार लिखाण कागदावर उतरले. आणि अठ्ठावीस गोष्टींचे ५२ पानी ‘मुळगावच्या मुलांच्या गोष्टी’ हे पुस्तक तयार झाले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘मुळगावच्या मुलांच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा झाला. दुर्गम व डोंगरी पाटण तालुक्यात लहान वयात समृध्द दहा लेखिका तयार झाल्या असून त्यांच्या नवनव्या कल्पना प्रत्यक्ष कागदावर उतरल्याने हे बाल लेखक  उद्याचे उत्तम साहित्यिक होतील असा विश्वास मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

विद्यार्थिनींची कल्पनाशक्ती, चिकाटी तसेच गटशिक्षणाधिकारी दिपा बोरकर यांची प्रेरणा, कार्यशाळा प्रशिक्षक नामदेव माळी, सदानंद कदम यांचे अनमोल मार्गदर्शन या पुस्तकासाठी लाभले. तसेच अमेय जोशी यांच्या सहकार्यामुळे ‘मुळगांवच्या मुलांच्या कथा’ हे पुस्तक आकारला आले.- योगिता बनसोडे, शिक्षिका, मुळगाव
 

कार्यशाळेत अनुभव व ज्ञानाचे भांडार खुले करत नामदेव माळी व सदानंद कदम सरांनी शिक्षकांमधे उर्जा निर्माण केली होती. त्याचाच प्रत्यय मुळगावच्या विद्यार्थ्यांकडुन आला आहे. इतरही शाळांमधे या उपक्रमातुन उदयोन्मुख लेखक व भविष्यातील समृध्द नागरिक घडवले जात आहेत. - दीपा बोरकर, गटशिक्षणाधिकारी, पाटण

Web Title: Students of Mulgaon Primary School in Patan Taluka wrote the book, Released by Minister Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.