जीवनाच्या संघर्षात विषाचा प्याला ठरतोय मोहरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:34+5:302021-03-19T04:38:34+5:30
सातारा: द्रारिद्र्य, बेरोजगारी आणि कौटुंबिक कलहातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत असून, जीवनाच्या संघर्षात विषाचा प्यालाच मोहरा ठरत असल्याचे ...

जीवनाच्या संघर्षात विषाचा प्याला ठरतोय मोहरा!
सातारा: द्रारिद्र्य, बेरोजगारी आणि कौटुंबिक कलहातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत असून, जीवनाच्या संघर्षात विषाचा प्यालाच मोहरा ठरत असल्याचे अलीकडे पाहायला मिळते. जिल्ह्यात एका आठवड्यात तब्बल १८ जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरूनच आयुष्य किती स्वस्त झालेय, याची प्रचीती येते. कोरोनाच्या शिरकावानंतर तर सर्वांच्याच आयुष्यात बदल झाला आहे. हे बदल कोणी सहन करतंय तर कोणाला सहन करता येइना. त्यामुळे अशा लोकांना आता विषाचा प्यालाच जवळचा वाटतोय.
कोरोनाने रोजगार हिरावल्याने अनेकजण बेरोजगार झाले. परिणामी, आर्थिक चणचण ही कौटुंबिक कलहाचे कारण ठरू लागले आहे. हे कलह आता एकमेकांचे जीव न घेता स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मानसिक संतुलन ढासळत असल्याने अगदी छोट्यातल्या छोट्या कारणातूही अनेकजण टोकाचे पाऊल उचलत आहेत. हे प्रमाण वर्षभरापूर्वीपेक्षा वाढल्याचे पोलिसांच्या नोंदवहीतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात गत आठवड्यात तब्बल १८ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये बहुतांश कारणे ही दारूच्या नशेत असली तरी बेरोजगारी आणि आर्थिक चणचण हे एक मुख्य कारण असल्याचे पोलिसांच्या डायरीमध्ये नोंद करण्यात आले आहे.
साताऱ्यातील करंजेपेठेतील शुभम भंडारे या २३ वर्षाच्या युवकाने दारूच्या नशेत स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा युवकही बेरोजगार आहे. त्याचबरोबर मयूर दशरथ मोरे (वय २२, रा. कारी, ता. सातारा) या युवकानेही दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिसरी घटना कोरेगाव तालुक्यात घडली. अशोक नामदेव गवळे (वय ५५) यांनीही राहत्या घरी दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केले. तसेच जावळी तालुक्यातील सर्जापूर येथील संजय नारायण मोहिते (वय ३५) या युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याचे आणखी एक कारण समोर आले ते म्हणजे, आजारपण. विशेषता वयोवृद्धांचे अंथरुणाला खिळलेले आजारपण. त्यांना सहन होत नाही, अशा कारणातूनही अनेक जण हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे पाहायला मिळते. सातारा तालुक्यातील अरे या गावातील अंकुश रामजी महाडिक या ८० वर्षीय वृद्धाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील अमर गायकवाड (वय ४०) यांनीही घरगुती कारणातून विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर खेड (ता.सातारा) येथील गणेश शिंदे (वय ३८) यांनीही राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे इतरांनीही असाच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यातील काही जणांची कौटुंबिक तर काही जणांची बेरोजगारी त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यात कारणीभूत ठरली आहे. रुग्णालयात अशा व्यक्तींना आणल्यानंतर नातेवाईकांकडून मूळ कारणांना बगल दिली जाते. त्यातील पहिले कारण आपली इज्जत जाईल तर दुसरे कारण आपल्या अंगलट येईल. फार तर अशा प्रकरणांमध्ये कोणाची तक्रार असेल तरच पोलीस यामध्ये डोकावून पाहतात. अन्यथा तक्रार नसेल तर केवळ जुजबी नोंद करून फाईल कायमची बंद करतात.
चौकटः राग करतोय राखरांगोळी
ताणतणाव, आर्थिक टंचाई, बेरोजगारी यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. परिणामी कौटुंबिक कलह वाढताहेत. यातून रागामुळे आयुष्याची राखरांगोळी होते. पोलीसदप्तरी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे राग हे एक प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे.