Local Body Election: बंडखोरांना भाजपचा फटका; ...तर कठोर कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:23 IST2025-11-25T16:21:29+5:302025-11-25T16:23:24+5:30
पक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना

Local Body Election: बंडखोरांना भाजपचा फटका; ...तर कठोर कारवाई करणार
सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध नगर पालिका, नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपकडून ज्यांना अधिकृत एबी फॉर्म दिले आहेत, तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार मानले जातील. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळालेल्या काही लोकांनी अपक्ष अर्ज भरले असून, अशा उमेदवारांनी प्रचार साहित्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा स्तरावरील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार नसलेल्या लोकांनी भाजप नेत्यांचे फोटो वापरू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही लोकांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार नसताना प्रचार साहित्यामध्ये भाजप नेत्यांचे फोटो वापरले आहेत. हा प्रकार पक्षाच्या धोरणाविरुद्ध असून, संबंधितांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांशिवाय इतर कोणत्याही अपक्ष किंवा अन्य पक्षाच्या व्यक्तींनी भाजपचे नेते किंवा पक्षचिन्हाशी साधर्म्य दर्शवणारे घटक वापरून भ्रामक प्रचार केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आणि पक्ष शिस्तभंग कारवाईनुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पक्षाचे नाव, चिन्ह तसेच वरिष्ठ नेत्यांचे फोटो हे फक्त अधिकृत उमेदवारांनाच वापरण्याची परवानगी आहे. पक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी याबाबत सतर्क राहावे, याबाबत कोणाचीही तक्रार आढळल्यास जिल्हा कार्यालयास तत्काळ कळवावे,’ असे आवाहन डॉ. भोसले यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.