बाजरी, सोयाबीनचा पेरा जास्त : खरिपाची पेरणी १०५ टक्के ; पावसामुळे भुईमुगाला अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:25 IST2019-08-13T21:21:41+5:302019-08-13T21:25:17+5:30
जिल्ह्यातील पेरणी ७ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार १०५ टक्के झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार ८८ हेक्टर आहे.

बाजरी, सोयाबीनचा पेरा जास्त : खरिपाची पेरणी १०५ टक्के ; पावसामुळे भुईमुगाला अडचण
सातारा : जिल्ह्यात उशिरा पाऊस आल्याने खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम होणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात १०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये बाजरी आणि सोयाबीनची पेरणी व टक्केवारीही अधिक असून, पावसामुळे भुईमूग आणि भात लागणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. तर त्यापूर्वी उन्हाळ्यात वळवाचा आणि मान्सूनपूर्व पाऊस बरसतो. त्यामुळे शेतकरी हे मान्सून सुरू होण्यापूर्वीच मशागतीची कामे करून बी-बियाण्यांची जुळवाजुळव करतो; पण यंदा वळवाचा पाऊसच झाला नाही. तर मान्सूनच्या पावसाने २० जूननंतर जिल्ह्यात प्रवेश केला. सुरुवातीला पूर्व आणि पश्चिम भागात चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना हायसे वाटले; पण त्यानंतर पूर्व भागाकडे पावसाने वक्रदृष्टी ठेवत पश्चिमेकडे जोरदार सुरुवात केली. परिणामी पूर्वेकडील पेरणी रखडणार, असे वाटत होते. तरीही शेतकऱ्यांनी असणाºया ओलीवर पेरणी उरकण्याचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणी ७ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार १०५ टक्के झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार ८८ हेक्टर आहे. त्याहून अधिक म्हणजे ३ लाख ७० हजार ७४९ हेक्टरवर पेरा झालाय. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र ५३ हजार ७५० हेक्टर असून, प्रत्यक्षात ५९ हजार १९६ हेक्टरवर शेतकºयांनी हे पीक घेतलंय. त्यानंतर भाताचे क्षेत्र ५० हजार ८१७ हेक्टर असलेतरी आतापर्यंत ४१ हजार २६५ हेक्टरवरच लागण झालीय. हे प्रमाण ८१.२० टक्के इतके आहे. कºहाडला ८ हजार ९७७ पैकी फक्त ४ हजार ३२० हेक्टरवर लागण झाली आहे. बाजरीचे क्षेत्र तिसºया क्रमांकावर असून, ४९ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र असलेतरी प्रत्यक्षात ५७ हजार १५५ हेक्टरवर पेरणी झालीय. बाजरी प्रामुख्याने माण, खटाव आणि फलटण तालुक्यात अधिक प्रमाणात घेण्यात येते.
भुईमुगाच्या पेरणीवर पावसाचा परिणाम झाला आहे. कारण, पश्चिम भागात पावसाची संततधार राहिली, त्यामुळे शेतकºयांना वेळेत पेरणी करता आली नाही. भुईमुगाचे ४० हजार ४३० हेक्टर एवढे क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे. त्यापैकी ३३ हजार २३० हेक्टरवर पेरणी झाली असून, टक्केवारी ८२.१९ इतकी आहे.
सातारा तालुक्यात ७ हजार ४२१ पैकी २ हजार ९२९, पाटणमध्ये १७ हजार ५६८ पैकी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीय. तर जावळी तालुक्यात सर्वसाधारणपणे २ हजार ९७४ हेक्टर क्षेत्र होते. तरीही
भुईमुगाची लागण ४ हजार ५८५ हेक्टरवर झाली. ही पेरणी अधिक ठरली आहे.
जिल्ह्यात ज्वारीची पेरणी ६२.६४ टक्के झाली आहे. तर मका ७४.३६ टक्के, नाचणी ७४.९७, तूर ७४.५७, उडीद १०५.१४, मुगाची १५६ टक्के पेरणी झाली आहे.
पश्चिमेकडे नुकसानीची भीती...
जिल्ह्यात पूर्वेकडे एकदम कमी पाऊस पडतो. तर पश्चिमेकडे पावसाळ्यात धुवाँधार असतो. यावर्षी पश्चिमेकडे पावसाने हाहाकार माजवला. तर पूर्वेकडे मात्र पावसाची दडीच आहे. त्यामुळे पूर्व भागातील पिकांसाठी पावसाची आवश्यकता आहे. तरच उत्पादन हाती येईल. पश्चिमेकडे मात्र सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होणार आहे. तर काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्याने पीकही संपल्याची स्थिती आहे.