Satara News: आईच्या निधनानंतर मुलाची आत्महत्या, कऱ्हाडमधील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 11:45 IST2023-01-23T11:44:54+5:302023-01-23T11:45:21+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

Satara News: आईच्या निधनानंतर मुलाची आत्महत्या, कऱ्हाडमधील दुर्दैवी घटना
कऱ्हाड : आईच्या निधनानंतर चौदाव्या दिवशीच मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील सोमवार पेठेत ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सोमवार पेठेत राहणारा अजित करंदीकर हा युवक कऱ्हाडमधील एका नामांकित बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. सोमवार पेठेतील घरात तो मोठा भाऊ व आईसमवेत राहत होता. वयोमानामुळे त्याच्या आईचे निधन झाले. त्यानंतर अजित व त्याच्या भावाने सर्व विधी पार पाडले. शुक्रवारी कार्य विधीही पार पडला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी अजितचा मोठा भाऊ काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. तो तासाभराने घरी परत आला असता अजितने गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते.