कातरखटाव : खटाव तालुक्यातील शिंगाडवाडी येथील म्हस्कोबा मंदिरातून गुरुवारी रात्री चोरट्यांनी सव्वापाच किलोची चांदीची कमान, साडेसात ग्रॅमची चांदीची देवाची मूर्ती, दानपेटीतील रोख रक्कम मिळून ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत माहिती अशी की, कातरखटावपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिंगाडवाडी, म्हस्कोबा मंदिरात गुरुवारी रात्री दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. देवाच्या कमानीला असणारी सव्वापाच किलोची चांदीची कमान उस्कटून काढली आहे. मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून गेली सहा महिने साठलेली दहा ते बारा हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे.सध्या कातरखटाव परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. चोरटे सध्या दागिन्यांवर डल्ला मारतातच याहूनही कुठे शेळी, मेंढी, बोकड, जनावरांची चोरी करण्याचे प्रकार घडत आहेत. या चोरट्याच्या उपद्रवामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.दोन किलोमीटरवर श्वान घुटमळलेशिंगाडवाडीतील चोरीची घटना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी श्वान व ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर श्वान घुटमळत राहिले. देवाचे पुजारी शरद शिंगाडे यांनी वडूज पोलीस स्टेशनला चोरीच्या घटनेची फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करत आहेत.
साताऱ्यातील शिंगाडवाडीमधील म्हस्कोबा मंदिरातून चांदीच्या कमानीची चोरी, दानपेटीही पळविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:00 IST