तिला पळवून नेताना बचावासाठी तिने रिक्षातून मारली उडी -साताऱ्यातील दिवसाढवळ्या घटना;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:32 IST2019-03-25T23:30:49+5:302019-03-25T23:32:46+5:30
रिक्षातून घरी जात असताना एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन अपहरणाचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित युवतीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका

तिला पळवून नेताना बचावासाठी तिने रिक्षातून मारली उडी -साताऱ्यातील दिवसाढवळ्या घटना;
सातारा : रिक्षातून घरी जात असताना एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन अपहरणाचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित युवतीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास संगमनगर परिसरात घडली.
दरम्यान, या प्रकारानंतर गुन्हे प्रकटीकरण आणि सातारा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळ्या. संतोष ऊर्फ नऱ्या रतन झोंबाडे (वय २९, रा. प्रतापसिंहनगर, पाण्याच्या टाकीजवळ खेड, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बसस्थानकाशेजारी उभ्या असलेल्या एका रिक्षामध्ये संबंधित पीडित युवती संगमनगर येथे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसली. तिच्यासोबत अन्य प्रवासीही रिक्षामध्ये बसले होते. बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात रिक्षा गेल्यानंतर रिक्षातील काही प्रवासी आपापल्या थांब्यावर खाली उतरले. त्यानंतर संबंधित युवती एकटीच रिक्षामध्ये राहिली. संगमनगर स्टॉप आल्यानंतर तिने रिक्षा चालक झोंबाडे याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, त्याने न ऐकल्यासारखे केले. त्यामुळे त्या युवतीने पुन्हा त्याला सांगितले; परंतु तरीही त्याने न ऐकताच रिक्षा भरधाव नेण्यास सुरुवात केली. संबंधित युवतीच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिने कसलाही मागचा पुढचा विचार न करता भरधाव रिक्षामधून थेट खाली उडी मारली. यामध्ये ती युवती जखमीही झाली. अशा अवस्थेत तिने माहुली दूरक्षेत्र येथे जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणे, रिक्षा तपासणे, माहितगार आरोपींचा शोध घेणे आदी सूचना पोलिसांच्या पथकाला दिल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून सुमारे २०० रिक्षा तपासल्या. त्यानंतर सहायक पोलीस फौजदार विष्णू खुडे यांना संबंधित रिक्षा चालकाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाच तासांच्या आत रिक्षा चालक संतोष झोंबाडे याच्या प्रतापसिंहनगरातून मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक एस. सी. पोरे, सहायक पोलीस निरीक्षक बी. जे. ढेकळे, सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. पवार, विष्णू खुडे यांचा सहभाग होते.