शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

By दीपक शिंदे | Published: July 5, 2023 05:28 PM2023-07-05T17:28:49+5:302023-07-05T17:38:20+5:30

अगोदर शिवेंद्रसिंहराजे नंतर उदयनराजे आणि आता रामराजे

Sharad Pawar is supported by common people in Satara, but Udayanraje, Shivendrasinhrajee and now Ramrajeraje have left their support | शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

googlenewsNext

दीपक शिंदे

सातारा : नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात साताऱ्यातून करताना शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुदर्शन घेतले. पण, त्यांचीच काही तत्त्वे अंमलात न आणल्यामुळे त्यांच्यापुढे काही अडचणी निर्माण झाल्या. काळानुसार त्यांनी घेतलेले निर्णय गरजेचे असतीलही, पण त्याचा फटका पक्षाला बसला हे मात्र नक्की. यशवंतराव चव्हाण यांनी राजघराण्याला सत्तेपासून लांब ठेवले होते. सर्वसामान्यांमध्ये सत्ता असली पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण, शरद पवारांनी राजघराण्याचे जनमानसातील वाढलेले महत्त्व लक्षात घेता राजघराण्यात सत्ता दिली. आता हेच राजे पवारांना सोडून इतर पक्षात गेल्याने राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करताना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये फार मोठी घराणेशाही करण्याचा प्रयत्न केला नाही. किसन वीर, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील यांना सत्तेच्या प्रवाहात सहभागी करून घेतले. जाणीवपूर्वक राजघराण्यांना बाजूला ठेवले. फलटणचे निंबाळकर घराणे राजकारणात असले तरी मालोजीराजे यांच्यानंतर काहीकाळ पोकळी निर्माण झाली होती.

साताऱ्यातील राजघराणी लांब जाण्यास केवळ त्यांचाच दोष आहे असेही नाही. तर, शरद पवारांनीदेखील दोन्ही दगडांवर हात ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राजघराण्यांना पक्षात सहभागी करून घेतले तरी सत्तेत सहभागी करून घ्यायला त्यांची फारशी मानसिकता नव्हती. त्यामुळे दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांना सत्तेत सहभागी करून घेतले तरीदेखील फारशी महत्त्वाची पदे मिळाली नाहीत.

कोल्हापूरचे राजे पक्षात आले अन् परत गेले

शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षात घेतले. राजघराण्यांचा सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी वापर करता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढविता येईल यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. पण, राष्ट्रवादीमध्ये ते रमले नाहीत. लोकसभेसाठी त्यांचा पराभव झाला आणि भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली.

शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे अन रामराजे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीनही राजे असल्याने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. त्याला इतरांचीही साथ मिळत होती. पण, पक्षांतर्गत धुसफुस वाढली. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राष्ट्रवादीकडून फारसा विचार होईना. अजित पवारांनी शब्द दिला तरी शरद पवार ताकद देईनात म्हटल्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत निवडून येऊनही उदयनराजेंनी भाजपचाच झेंडा हातात घेतला. रामराजेंना तर शरद पवारांनी सर्वकाही दिले, पण अखेर तेही सोबत राहिले नाहीत.

Web Title: Sharad Pawar is supported by common people in Satara, but Udayanraje, Shivendrasinhrajee and now Ramrajeraje have left their support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.