Satara Crime: महाबळेश्वरमध्ये व्हेलची ५ किलो उलटी जप्त, मालवणच्या तिघांसह सातजण ताब्यात; कोट्यवधीची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:25 IST2026-03-06T13:24:34+5:302026-03-06T13:25:17+5:30

कोकण, किनारपट्टी भागातून तस्करी

Seven people arrested in Mahabaleshwar with 5 kg of whale vomit worth crores of rupees in the international market | Satara Crime: महाबळेश्वरमध्ये व्हेलची ५ किलो उलटी जप्त, मालवणच्या तिघांसह सातजण ताब्यात; कोट्यवधीची किंमत

संग्रहित छाया

महाबळेश्वर : आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करीचा सातारा वन विभागाने पर्दाफाश केला आहे. महाबळेश्वर परिसरात सापळा रचून कारवाई करत वन विभागाने तब्बल ५ किलो ३०० ग्रॅम अंबरग्रीस जप्त करत सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे.

वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सहायक वनसंरक्षक सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर आणि संरक्षण पथकाने संयुक्त कारवाई करत संशयितांवर सापळा रचला. महाबळेश्वर परिसरात आलेल्या तीन अलिशान कारची झडती घेतली असता, त्यामध्ये अंबरग्रीसचा मोठा साठा आढळला. 

यानंतर वन विभागाने अतुल अशोक विश्वासराव (रा. ठाणे), आकाश श्यामसुंदर धुरी (रा. मालवण), एव्हन्स क्लेमेंट फर्नांडिस (रा. मालवण), हितेंद्र मनोहर शेठे (रा. लालबाग, परळ), कौस्तुभ मिलिंद प्रभू (रा. धनकवडी, पुणे), मोहन हरिभाऊ पाटील (रा. भांडुप, ठाणे) आणि विल्सन झुजे फर्नांडिस (रा. मालवण) या सात जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर वनगुन्हा दाखल केला असून, तस्करीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई सातारा जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर (प्रा.) महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) गणेश महांगडे, वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक तुकाराम निकम, बाबू मराडे, देविंद्र पोवार, अविनाश गवळी आदी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

सात वर्षांच्या कारावासाची तरतूद

वन विभागाने आरोपींकडून जप्त केलेले अंबरग्रीस हे दुर्मिळ व्हेल प्रजातीचे असल्याचे सांगितले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत या पदार्थाची विक्री, खरेदी, वाहतूक किंवा साठवण करणे गंभीर गुन्हा असून, त्यासाठी ७ वर्षांपर्यंत कारावास व मोठ्या दंडाची तरतूद आहे.

कोकण, किनारपट्टी भागातून तस्करी

आंतरराष्ट्रीय बाजारात अंबरग्रीसला मोठी मागणी आहे. कोकण व किनारपट्टी भागातून त्याची तस्करी होत असल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे अंबरग्रीस तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Seven people arrested in Mahabaleshwar with 5 kg of whale vomit worth crores of rupees in the international market