साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिक अरुण गोडबोले यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:12 IST2025-10-15T15:12:11+5:302025-10-15T15:12:44+5:30
चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटविला

साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिक अरुण गोडबोले यांचे निधन
सातारा : ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि सातारा शहरातील ज्येष्ठ सामाजिक नेते अरुण रामकृष्ण गोडबोले (वय ८२) यांचे मंगळवारी (दि. १४) दुपारी सातारा येथील रुग्णालयात निधन झाले.
येथील दी युनायटेड वेस्टर्न बँक, आयुर्वेदिय अर्कशाळा, सज्जनगडचे समर्थ सेवा मंडळ, अंत्यसंस्कार सहायक मंडळ अशा अनेक संस्थांमधून त्यांनी विविध पदांची जबाबदारी पेलली. चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटविला. कविता, प्रवास वर्णन, ललित, संत साहित्य अशा विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले.
कौशिक प्रकाशन या संस्थेमार्फत त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. याशिवाय, रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून ‘सातारा भूषण’ पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांचा यथोचित सन्मान केला. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान अमूल्य होते.
त्यांच्या पश्चात बंधू अशोक व डॉ. अच्युत गोडबोले, पत्नी अनुपमा, मुलगा उदयन, सून संजीवनी, मुलगी डॉ. गौरी ताम्हणकर, जावई डॉ. हेमंत ताम्हणकर, पुतणे प्रद्युम्न व डॉ. चैतन्य, नातवंडे, असा परिवार आहे.