शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 06:16 IST2025-07-22T06:16:08+5:302025-07-22T06:16:52+5:30

एकतर्फी प्रेमातून एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीच्या गळ्याला तरुणाने चाकू लावला.

Schoolgirl held to knife's throat; Girl rescued after 15 minutes of terror | शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका

शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका

सातारा :  एकतर्फी प्रेमातून एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीच्या गळ्याला तरुणाने चाकू लावला. यात मुलीच्या बोटाला चाकू लागला, तर त्या तरुणाला पकडताना एका व्यक्तीच्या हाताला चाकू लागून तो जखमी झाला. सुमारे पंधरा मिनिटांच्या थरारक घटनेनंतर मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.  सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता एक धक्कादायक घटना घडली. आर्यन चंद्रकांत वाघमळे (वय १८, रा.सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

करंजे परिसरातील एक शाळा सायंकाळी सुटल्यानंतर मुले-मुली शाळेतून बाहेर आली. याच वेळी शाळेच्या परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपीने संबंधित मुलीचा हात धरला. त्यानंतर, सोबत असलेला चाकू त्याने मुलीच्या गळ्याला लावला. हा प्रकार पाहून इतर मुली आरडाओरडा करू लागल्या. मुलगी सुटका करण्यासाठी धडपत होती. या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. 

पकडल्यानंतर नागरिकांनी दिला चोप
पोलिसांनी चारही बाजूंनी त्याला वेढले. समोरच्या बाजूने त्याला पोलिसांनी बोलण्यात गुंतवले. अचानक एका पोलिसाने पाठीमागून दबक्या पावलाने येऊन आरोपी मुलाला धरून जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर, त्याला जमावाने चांगलाच चोप दिला. शाहुपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.  

मुलीचा जीव लागला होता टांगणीला
पोलिसांनी आरोपी मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘तुम्ही सगळे येथून जावा,’ असे तो सगळ्यांना म्हणत होता. मध्येच तो मुलीच्या गळ्याला चाकू लावायचा. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी बराच प्रयत्न करत होती; परंतु त्याने तिला घट्ट पकडल्यामुळे तिला काहीच करता येत नव्हते.

चल आपण पळून जाऊ...
संबंधित तरुण आणि मुलगी काही महिन्यांपूर्वी एकाच परिसरात राहत होते. मात्र, संबंधित मुलीचे कुटुंबीय डिसेंबर महिन्यात दुसरीकडे राहण्यास गेले. त्यानंतर, तो तिला भेटण्यासाठी सतत त्रास देत होता. ‘चल आपण पळून जाऊ,’ असे तो तिला म्हणत होता. हा प्रकार पालकांच्या कानावर घालण्यात आला होता. त्यावेळी त्याला समजावून सांगण्यात आले, परंतु सोमवारी त्याने थेट चाकू घेऊन त्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

Web Title: Schoolgirl held to knife's throat; Girl rescued after 15 minutes of terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.