Satara ZP Election Voting 2026: सातारा जिल्ह्यात वडगावमध्ये किरकोळ वादावादी, दुपारी १२ पर्यंत २२ टक्के मतदान
By नितीन काळेल | Updated: February 7, 2026 12:41 IST2026-02-07T12:40:26+5:302026-02-07T12:41:17+5:30
६५ गट, १२९ गणांसाठी मतदान सुरू; मोठ्या गावांच्या ठिकाणी मतदानासाठी रांगा

Satara ZP Election Voting 2026: सातारा जिल्ह्यात वडगावमध्ये किरकोळ वादावादी, दुपारी १२ पर्यंत २२ टक्के मतदान
सातारा : जिल्ह्यात सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १२९ गणांसाठी शनिवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत ७ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी बारापर्यंत मतदानाची टक्केवारी २२ पर्यंत गेली होती. वडगावमध्ये मतदानाच्या कारणावरून किरकोळ वादावादी निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या निवडणुकीसाठी एकूण २१ लाख ९४ हजार मतदार आहेत.
सातारा जिल्हा परिषद आणि ११ तालुक्यांतील पंचायत समितींची सार्वत्रिक निवडणूक नऊ वर्षांनी होत आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पण, माण तालुक्यातील आंधळी गणाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे ६५ गट आणि १२९ गणांसाठी शनिवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली.
सकाळच्या टप्प्यात मतदानाला उत्साह दिसून आला नाही. मात्र, दहा वाजल्यानंतर मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे २२ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले होते. मोठ्या गावांच्या ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. तर बाहेरगावी असणाऱ्या मतदारांसाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रशासनाने आवाहन केलेले आहे.
महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक ३४ टक्के मतदान...
दुपारी १२ पर्यंत सातारा तालुक्यात २१ टक्के मतदान झाले होते. कराडला २१.६३ टक्के, पाटण १८.३३, कोरेगाव २१.८३ टक्के, वाई २२.६७, खंडाळा २१ टक्के, जावळी १८, फलटण २२.५७, माण तालुका २४.३२ टक्के, खटाव तालुक्यात १९.६१ तर सर्वाधिक मतदान महाबळेश्वर तालुक्यात ३४.११ टक्के झाले होते.