बहिणीला देत होता त्रास; साताऱ्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; मृतदेह जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 15:36 IST2021-04-07T15:31:51+5:302021-04-07T15:36:03+5:30
Murder CrimeNews Police Satara : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून एका वीस वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील खंडोबाच्या माळाजवळ उघडकीस आली. विशेष म्हणजे हा खून केवळ दोन तासांत एलसीबीच्या पथकाने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यातील एकावर दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बहिणीला देत होता त्रास; साताऱ्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; मृतदेह जाळला
सातारा : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून एका वीस वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील खंडोबाच्या माळाजवळ उघडकीस आली. विशेष म्हणजे हा खून केवळ दोन तासांत एलसीबीच्या पथकाने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यातील एकावर दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आकाश ऊर्फ रॉजर राजेंद्र शिवदास (२०, रा. रामनगर, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, विक्रांत ऊर्फ मन्या उमेश कांबळे (१९), तेजस नंदकुमार आवळे (१९,) संग्राम बाबू रणपिसे (२८, सर्व रा. रविवार पेठ, सातारा) या तिघांना खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मन्या कांबळे याच्यावर यापूर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बसस्थानकापासून जवळ असलेल्या खंडोबाचा माळ येथे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह काही नागरिकांना दिसला. सुरुवातीला हा मृतदेह एका मुलीचा असल्याची चर्चा सुरू झाली; परंतु मृतदेहाच्या जागेवरच शवविच्छेदन झाल्यानंतर हा मृतदेह पुरुषाचा असल्याचे अखेर स्पष्ट झाले. नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर केवळ दोन तासांनंतर पोलिसांनी उलगडा केला.
आकाश हा आई-बहिणीवरून शिवीगाळ करत होता. तसेच बहिणीला त्रास देत होता. त्यामुळेच त्याचा मित्रांना सोबत घेऊन काटा काढल्याचे मन्या कांबळे याने पोलिसांना सांगितले. आकाश शिवदास हा मंडईमध्ये भाजी विक्रीचे काम करत होता. तो एकुलता एक होता. खुनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, मदन फाळके, जोतीराम बर्गे, कांतीलाल नवघणे, संयज शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, विजय कांबळे, अतीश घाडगे, संतोष पवार यांनी केली.
असा रचला कट!
आकाश हा रविवार पेठेतील भाजी मंडईत भाजी विक्री करतो. सोमवारी रात्री तो मंडईतून घरी जात असताना तिघा संशयितांनी त्याला अडवून गप्पांमध्ये गुंतवले. रात्र झाल्यानंतर त्याला पाण्याच्या बाटलीतून गुंगीचे औषध दिले. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह खंडोबाचा माळ परिसरातील निर्जन ठिकाणी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.