Satara Rains: साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून गाय ठार, नारळानेही घेतला पेट
By नितीन काळेल | Updated: May 16, 2025 20:36 IST2025-05-16T20:32:35+5:302025-05-16T20:36:13+5:30
Satara Unseasonal Rains: सातारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली.

Satara Rains: साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून गाय ठार, नारळानेही घेतला पेट
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क: सातारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाने एक तासभर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. त्याचबरोबर घरे, दुकाने आणिृ हॉटेलमध्ये पाणी शिरले. दरम्यान, फलटण तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. एके ठिकाणी नाराळाच्या झाडाने पेट घेतला. तर कापडगावला वीज पडल्याने गाय ठार झाली.
जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमानातही मोठ्या प्रमाणात उतार आला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यातच जिल्ह्यातील काही भागात पाऊसही झाला. पण, शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात आभाळ भरुन आले. यामुळे काही भागात पाऊस पडला. सातारा शहरासह तालुक्यात तर सकाळी ११ पासूनच पावसाचे थेंब पडू लागले. त्यानंतर साडे आकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटात पाऊस पडत होता. अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले तरीही रिपरिप सुरूच होती. दुपारी सवाबारानंतरच पाऊस एकदम कमी होत गेला. या पावसामुळे सातारा शहरातील सखल भागात पाणी साचले. तसेच खोलगट भागातील घरे, दुकाने आणि हाॅटेलात पाणी शिरले.
सातारा तालुक्यातील वर्ये, लिंबखिंड परिसरात चांगला पाऊस झाला. जोरदार पावसामुळे समोरील वाहनही दिसत नव्हते. वाहने लाईट लावून जात होती. त्यातच वारा वाहत असल्याने पावसाचे पाणी घरे, हाॅटेलात शिरत होते. यामुळे दरवाजे बंद करण्याची वेळ आलेली. तसेच परिसरातील ओढ्याला पाणी वाहिले.