Satara: राज्यपालांनाही वाहतूक कोंडीचा फटका, गर्दीतून मार्ग काढताना करावी लागली कसरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:31 IST2025-10-27T14:30:21+5:302025-10-27T14:31:43+5:30
वाहतूक सुरळीत करत असताना पोलिसांना ऊन व पाऊस असा दुहेरी सामना करावा लागला

Satara: राज्यपालांनाही वाहतूक कोंडीचा फटका, गर्दीतून मार्ग काढताना करावी लागली कसरत
खंडाळा : दिवाळीच्या सुट्या संपवून नोकरदार वर्ग माघारी शहरांच्या दिशेने निघाल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गर्दी उसळली आहे. वाई तालुक्यातील वेळेपासून खंबाटकी बोगदा व पुढे खंडाळा जुना टोल नाका परिसरामध्ये वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका महाबळेश्वर दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राच्या राज्यपालांनाही बसला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या ताफ्याला खंबाटकी बोगद्याबाहेरील गर्दीतून मार्ग काढताना कसरत करावी लागली.
रविवारी रस्त्यावर वाहनांची प्रचंड संख्या झाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. दिवसभर वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिस दलाचे सहायक पोलिस निरीक्षक वंजारी, पोलिस उपनिरीक्षक गोरड व सहकारी, खंडाळा पोलिस स्टेशन व भुईंज पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
गर्दीत व बोगद्याबाहेरील परिसरात वाहतूक सुरळीत करत असताना मध्येच ऊन व मध्येच पाऊस असा दुहेरी सामना करावा लागला. तसेच याठिकाणी अन्न-पाणी उपलब्ध नसल्याने पोलिसांची प्रचंड तारांबळ झाली. सकाळपासून विस्कळीत झालेली वाहतूक रात्री उशिरापर्यंत सुरळीत झाली नव्हती.