Local Body Election: यादीत फोटो नाहीत; मतदार शोधायचे कुठे अन् कसे?, माजी नगसेवकाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:32 IST2025-11-08T17:32:25+5:302025-11-08T17:32:56+5:30
Local Body Election: सातारा पालिका निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांकडून बैठक

संग्रहित छाया
सातारा : सातारा नगरपालिकेच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांची बैठक घेतली. यामध्ये पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवारांना निवडणूक अर्ज भरणे, खर्च मर्यादापासून मतमोजणीपर्यंतची माहिती दिली. तसेच यावेळी एका माजी नगरसेवकाने सभागृहात एका प्रभागाची मतदार यादी आणून त्यामध्ये मतदाराचे फोटो नाहीत. त्यांना शोधायचे कुठे, असा प्रश्नही केला. यावर अधिकाऱ्यांनी फोटो नसल्याबद्दल माहिती घेऊन सांगू, असे आश्वस्त केले.
सातारा पालिकेच्या श्री छ. शिवाजी महाराज सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आशिष बारकुल, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी विनोद जळक आदींसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
बैठकीत अधिकाऱ्यांनी १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावे, अशी माहिती दिली. तसेच नोंदणीकृत राजकीय पक्षातर्फे निवडणूक लढवीत असल्यास जोडपत्र १ आणि २ जोडावे. हे जोडपत्र नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांक व वेळेत सादर करावे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही अपील नसलेल्या ठिकाणी १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी २६ नोव्हेंबर रोजी होईल, अशी माहितीही देण्यात आली.
शेकडो मतदारांचे फोटोच नाहीत...
पालिकेतील बैठकीतच एक माजी नगरसेवक आले होते. त्यांनी आपल्या हातात त्यांच्या प्रभागाची मतदार यादी आणलेली. आल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे तक्रार केली. संबंधित नगरसेवकाने मतदार यादी दाखवून त्यामध्ये शेकडो मतदारांचे फोटोच छापलेले नाहीत. प्रभागात साडेसहा हजारांहून अधिक मतदार आहेत. त्यांचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे त्यांना कुठे शोधू, त्यांच्यापर्यंत कसे पाेहोचू, अशी मागणी मांडली. यावर मुख्याधिकारी जळक यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ, असे सांगितले; पण शेकडो मतदारांचे फोटो यादीत नसल्याने संबंधितांना कसे ओळखायचे, अशी चर्चा इतरांतही सुरू झाली होती.